पिरंगुट, पुढारी वृत्तसेवा: जीवघेण्या खड्डयांमुळे पिरंगुट येथील मुकाईवाडी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिर ते बोतरवाडीपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेचार कोटी खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु तो आता खड्डेमय झाल आहे.
मुकाईवाडीकडे जाताना घाट उतार संपला की लगेचच प्रचंड मोठे खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत. तिथून खड्ड्यांना जी सुरुवात झाली ती बोतरवाडीच्या फाट्यापर्यंत पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. मुकाईवाडी जवळील ओढ्यामध्ये तर रस्त्यावर पाणी साठून अनेक मोठे खड्डे पडलेले आहेत.
हा रस्ता लावासा मुठा खोर्याकडे जाण्यासाठी जवळचा असल्याने शनिवार आणि रविवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. रस्त्यावर टाकलेली खडी उखडून बाहेर आलेली असून डांबराखाली असलेला जुना रस्ता उघडा झाला आहे. रस्त्यावर धुळीचे साम्रराज्य आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून पडलेले आहेत, तर छोटे मोठे अपघातही झालेले आहेत.
मुकाईवाडी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी सगळीकडूनच हाल आहेत. मुकाईवाडीला जाण्यासाठी पिरंगुट घाटाकडून एक रस्ता, पिरंगुट गावातून येणारा एक रस्ता आणि उरवडे गावातून येणारा एक रस्ता असे तीन रस्ते या ठिकाणी येतात. परंतु तीनही रस्ते चांगले नसल्यामुळे येथे येण्यासाठी ग्रामस्थांना खड्ड्यांचा त्रास सहन करूनच यावे लागते.
मुकाईवाडी तसेच पिरंगुटमध्ये सर्वच पक्षांचे मोठे कार्यकर्ते राहतात. त्यांना रस्त्याची अडचण सोडवता येत नसल्याचे स्पष्ट चित्र या ठिकाणी दिसत आहे. निवडणूक जवळच आलेली आहे, त्यामुळे मते मागण्यासाठी येणार्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना आम्ही जाब विचारणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.