पुणे: राज्य सरकारच्या ‘पिंक ई रिक्षा’ योजनेसाठी स्वयंरोजगार मिळण्यासाठी महापालिका हद्दीतील दोन हजार 800 महिलांना ई रिक्षा देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका सोमवारपासून जनजागृती करणार आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने ‘पिंक- ई रिक्षा’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तीन लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बालकल्याण विभाग यांच्यासोबत महापालिकेच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येत आहे.
त्यानुसार शासनकडून ई- रिक्षासाठी नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका तसेच या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या खासगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती, राज्य शासन 20 टक्के निधी देणार आहे, तर लाभार्थी महिला, मुली यांना 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. या रिक्षासाठी देण्यात येणारे 70 टक्के कर्ज लाभार्थी महिलांना पाच वर्षांत परतफेड करावी लागणार आहे.
ही योजना शहरात राबविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 2 हजार 800 रिक्षांसाठीचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी आर. चव्हाण यांनी दिली. योजनेचे अर्ज क्षेत्रीय कार्यालयामधील समाज विकास विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज कागदपत्रांसह या ठिकाणीच जमा करावे लागणार आहेत.
योजनेच्या अटी
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे.
अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे आवश्यक
लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विधवा, कायद्याने घटस्फोटित महिलांना प्राधान्य.