पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात महिलेच्या नावाने निवासी मिळकत असल्यास त्यांना सामान्य करात 50 टक्के सवलत दिली जाते. त्यासाठी दरवर्षी अर्ज करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. सवलतीसाठी दरवर्षी अर्ज करण्याची गरज नाही.
ज्या महिलांनी नोंदणी केली नाही त्यांनी विभागीय कर संकलन कार्यालयात नोंद करून 50 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सोमवारी (दि.18) केले.
महापालिकेकडे एकूण 5 लाख 71 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद आहे. मिळकतकरासाठी पालिकेच्या वतीने विविध सवलती दिल्या जातात.
निवासी मिळकत महिलेच्या नावे असल्यास सामान्यकरात 50 टक्के सवलत दिली जाते. सन 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 7 हजार 992 महिलांनी त्या सवलतीचा लाभ घेतला.
ती एकूण रक्कम 2 कोटी 2 लाख आहे. शहरातील घर, बंगला किंवा सदनिका नावावर असलेल्या महिलांनी विभागीय कर संकलन कार्यालयात त्याची नोंदणी करून घेतल्यास सवलतीचा लाभ दिला जातो.
एकूण 1 हजार 912 माजी सैनिकांनी सवलतीचा लाभ घेतला. ती एकूण सवलत 1 कोटी 41 लाख आहे. ऑनलाइन भरणा केल्यास 10 ते 5 टक्के सूट दिली जाते.
त्याचा लाभ तब्बल 1 लाख 53 हजार 206 मिळकतधारकांनी घेतला. ही एकूण रक्कम 12 कोटी 74 लाख आहे. शौर्यपदक धारक मिळकतींनाही सूट दिली जाते. शहरातील एकूण 7 मिळकतींना 1 लाखाची सूट दिली गेली आहे.
मुदतीपूर्वी बिला केल्यासही मोठी सुट दिली जाते. एकूण 37 हजार 508 मिळकतधारकांनी मुदतीच्या पूर्वी बिल भरून एकूण 1 कोटी 55 लाखांची सवलत मिळविली.
दिव्यांगांच्या नावे मिळकत असलेल्यांना सवलतीचा लाभ मागील वर्षी 591 जणांनी घेतला. सवलतीची रक्कम 13 लाख आहे. शहरातील एकाही हरित मिळकतीस (ग्रीन बिल्डींग) सूट दिली गेली नाही. दरम्यान, कचर्याची स्वत: विल्हेवाट लावणार्या शहरातील शाळांनाही सामान्य करात सवलत दिली जाणार आहे.
गेल्या सन 2021-22 या आर्थिक वर्षांत एकूण 2 लाख 1 हजार 216 मिळकतधारकांना एकूण 17 कोटी 86 लाखांची सवलत पालिकेने दिली आहे. त्यांनी एकूण 252 कोटींचा भरणा केला आहे.
सन 2019-20 वर्षात सर्वांधिक 2 लाख 25 हजार 733 मिळकतधारकांनी 262 कोटी 45 लाखांचा भरणा करीत 16 कोटी 31 लाखांची सवलत मिळविली होती.