पुणे

पिंपरी : शहराची तहान भागविण्याचे काम निश्चितच होईल ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती तहान भागविण्यासाठी नियमाच्या बाहेर जाऊन 250 एमएलडी पाणी शहरासाठी मंजूर केले. आंद्रा व भामा आसखेड धरणातून हे पाणी शहरासाठी लवकरच आणले जाणार आहे. त्यातून शहराची तहान भागविण्याचे काम निश्चितच होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नसता तर त्यांचा मोठेपणा दिसला असता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मात्र, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची काय ताकद होती हे आम्ही निवडणूकीतूनच दाखवुन देऊ, असे आव्हानही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, माजी खासदार अमर साबळे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, शंकर जगताप आदी उपस्थित होते. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शास्ती कराच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार
मोगलांच्या काळातील जिझिया करासारखा पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर शास्ती कर लावण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे शासन होते. मात्र, भाजप-शिवसेना महायुती सरकारने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा शास्तीकर रद्द केला. त्यानंतर लक्षात आले की एवढ्याने नागरिकांची सुटका होत नाही. त्यामुळे शास्ती कर संपूर्णपणे रद्द करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. त्याचा शासन आदेश काढला नाही, तर सरकारवर हक्कभंग येतो. त्यामुळे विधानसभेत केलेल्या घोषणेचा शासन आदेश काढावाच लागतो. केलेल्या घोषणेप्रमाणे नक्कीच शासन आदेश काढून शास्तीकर संपूर्णपणे रद्द करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

राष्ट्रवादीचा बदला घेण्यासाठी आलो आहे
चिंचवड विधानसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मात्र, येथे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिस्पर्धी उमेदवार दिला. अजित पवार म्हणाले, होऊन जाऊ द्या. आम्हीही म्हणतो, होऊन जाऊ द्या तर होऊन जाऊ द्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा बदला घेण्यासाठी आम्ही आलो आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले
यांनी केले.

…आणि अश्विनी जगताप यांचे डोळे पाणावले
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना अश्विनी जगताप यांचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला', हे विधान केले होते. त्याचप्रमाणे, चिंचवड मतदारसंघात जरी आता साहेब नसले तरी येथील गड आपल्याला राखायचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT