पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान या राज्यस्तरीय स्पर्धेत सन 2021-22 या वर्षात प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे.
कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व कार्यपद्धतीचा अंगीकार, ई-गव्हर्नन्स, लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात पालिका अव्वल ठरली आहे. दहा लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक राज्य शासनाने जाहीर केले.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता तसेच, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येते.
अभियानांतर्गत सहभाग घेऊन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये, सर्वात्कृष्ट कल्पना व उपक्रम सुचविणार्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिक देण्यात येते.
राज्यस्तरावर चार गटात हे पारितोषिक दिले जाते. स्पर्धेसाठी सर्व स्तरांवरून ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले होते. स्पर्धेत पिंपरी-चिंचवडने सहभाग घेतला होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रशासकीय कामकाजामध्ये नवनवीन संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार केला आहे. शिवाय लोकाभिमुख कार्यालयाचे व्यवस्थापन केले असून, नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून
दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेले काम राज्यात अव्वल ठरले असून, त्यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. नागरिकांचा सहभाग व योगदान यामुळेच हे शक्य झाले आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.