पुणे

Pimpri News : मोशीत होणार आठ मजली रुग्णालय

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 750 बेडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाच्या धर्तीवर मोशी येथे आठ मजली 850 बेडचे मल्टीस्पेशलिटी रूग्णालयात बांधण्यात येत आहे. त्यासाठी एकूण 356 कोटी 78 लाख 30 हजार खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरी दिली. हा दर निविदेपेक्षा 4.73 टक्के अधिक आहे.
नागरिकांचा उत्तम वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून चिखली येथील गट क्रमांक 1653 येथील आरक्षण क्रमांक 1/88 या भूखंडावर रुग्णालय बांधण्यात येणार होते.

त्याला सर्वसाधारण सभेने 20 जानेवारी 2021 ला मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक 1 चिखली येथील गट क्रमांक 1653 व 1654 (गायरान) मधील आरक्षणावर 850 बेडचे रुग्णालय विकसित करण्यासाठी 215 कोटी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. रुग्णालयासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, जागा वनक्षेत्रात असल्याने ती जागा देण्यास जिल्हाधिकार्यांनी नकार दिला.

त्यामुळे चिखलीऐवजी मोशी येथील गट क्रमांक 646 मधील गायरान जागेवर रूग्णालय बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. रुग्णालयाची जागा बदलल्याने विरोधकांनी प्रशासनावर टीका केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोशी गायरान जागेतील ताब्यात आलेल्या 6 हेक्टर जागेत रुग्णालय बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. रूग्णालयासाठी कोटेशन प्रक्रिया राबवून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व आर्किटेक्ट म्हणून बेरी बिल्टस्पेस डिझाईनची नेमणूक करण्यात आली.

रुग्णालयात उभारण्यासाठी स्थापत्य प्रकल्प विभागाने निविदा काढली. त्यासाठी वॅसकॉन इंजिनिअर्स लिमिटेडची 4.73 टक्के जास्त दराची निविदा मंजुर करण्यात आली आहे. तो एकूण खर्च 356 कोटी 78 लाख इतका आहे.
तर, हर्ष कन्स्ट्रक्शनची 15 टक्के अधिक आणि न्याती इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कन्सल्टंटची 20.60 टक्के अधिक दराची निविदा होती. कामाची मुदत 3 वर्षे आहे. या नवीन रुग्णालयामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT