पुणे

पिंपरी : मिळकतकरातून महापालिकेस 620 कोटी 27 लाखांचे उत्पन्न

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीत मिळकत करापोटी कर संकलन विभागाकडून 620 कोटी 27 लाखांचे उत्पन्न सन 2021-22 या आर्थिक वर्षात जमा झाले आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वषार्ंत घटलेल्या उत्पन्नास यामुळे उभारी मिळणार आहे. गेल्या सन 2021-22 वर्षात एकूण 556 कोटींचा एकूण भरणा झाला होता.

शहरामध्ये 5 लाख 70 हजार मिळकतधारक आहेत. त्यापैकी गुरुवार (दि.31) पर्यंत एकूण 3 लाख 24 हजार 572 मिळकतधारकांनी एकूण 620 कोटी 26 लाख 23 हजार 597 रुपयांचा मिळकतकराच्या बिलांचा भरणा केला आहे.

त्यात थेरगाव कार्यालयाने सर्वांधिक 135 कोटी 73 लाखांचा कर जमा केला आहे. त्या पाठोपाठ दिघी-बोपखेल 53 कोटी 1 लाख , सांगवी 52 कोटी 47 लाख, चिखली 51 कोटी 58 लाख आणि भोसरी कार्यालयातून 46 लाख 98 हजार रुपये भरणा झाला आहे. तर, सर्वात कमी भरणा पिंपरी कॅम्प कार्यालयात फक्त 5 कोटी 88 लाख रुपये जमा झाले आहेत.

मिळकत करापोटी जमा झालेल्या 620 कोटीपैंकी ऑनलाइन माध्यमातून सर्वांधिक 284 कोटी 89 लाख जमा झाले आहेत. तब्बल 2 लाख 322 जणांना ऑनलाइन बिलींग केले आहे.

त्यामुळे नागरिक दिवसेंदिवस ऑनलाइन पद्धतीच्या व्यवहारास अधिक पसंती देत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर धनादेशाद्वारे 133 कोटी 9 लाख रुपये जमा झाले आहेत. रोखीने 85 कोटी 53 लाखांचा भरणा झाला आहे.

एप्रिलपासून मिळकतकराची बिले वाटपास सुरुवात

शहरात एप्रिल 2022 पासून मिळकतकराची बिले वाटण्यास सुरूवात केली जाणार आहेत. बिले स्पीड पोस्टाने घरोघरी पाठविली जाणार आहेत. शहरात घर घेऊन परदेशात राहणार्‍या सदनिकाधारकांवर आता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

तब्बल 2 लाख 45 हजार मिळकतधारकांनी बिले भरले नाही. त्यांचा शोध घेऊन त्यांना नोटीसा दिल्या जाणार आहेत. वसुली मोहिम सन 2022-23 आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यांपासून सुरू केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

बांधकाम परवानगी विभागास विक्रमी 1 हजार 20 कोटींचे उत्पन्न

पिंपरी : कोरोनामुळे दोन वर्षे महापालिकेच्या बांधकाम परवानगीतून मिळणार्‍या उत्पन्नात घट झाली होती. मात्र, सन 2022-23 यावर्षी बांधकाम परवानगीतून वर्षाअखेरीस तब्बल 1 हजार 20 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न जमा झाले आहे.

त्यावरून शहरात बांधकाम क्षेत्र तेजीत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रावर परिणाम झाल्याने बांधकाम परवानगी विभागाचे उत्पन्न घटले होते.

सन 2020-21 ला 328 कोटी 91 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. तर, सन 2019-20 मध्ये 581 कोटी 3 लाखांचे उत्पन्न जमा झाले होते. यंदा प्रथमच 1 हजार कोटी 20 कोटींचे विक्रमी स्वरूपात उत्पन्न मिळाले आहे, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

पाणीपट्टीतून 45 कोटी, आकाशचिन्ह विभागास 12 कोटी

पिंपरी : महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपट्टी बिलाची वसुलीचे प्रमाण खूपच कमी आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षांत सुमारे 55 कोटींची वसुली झाली आहे.

तर, आकाशचिन्ह व परवाना विभागाने 12 कोटी 58 लाखांचे उत्पन्न वर्षाभरात मिळविले आहे. शहरात 1 लाख 67 हजार अधिकृत नळजोडधारक आहेत. पाणीपट्टीपोटी वर्षाअखेरीस सुमारे 55 कोटी रुपये वसूल झाले आहेत.

मात्र, पाणीपट्टी विभागाकडील थकबाकीचा आकडा वाढला असून सुमारे 66 कोटींपर्यत थकबाकी आहे. थकबाकी वसुलीकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे.

तर, आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात परवान्यातून 12 कोटी 58 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या विभागाचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. जाहिरात कर, परवाना फी, उद्योग परवाना फी. जागा भाडे, सेवा कर, पोल भाडे, दंड अशा विविध प्रकारे हे शुल्क आकारले जाते.

SCROLL FOR NEXT