पुणे

पिंपरी : डीबी पथक सुस्त १५०० आरोपी वॉन्टेड

backup backup

पिंपरी : संतोष शिंदे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांमध्ये असलेल्या डीबी (तपास) पथकांमध्ये एक प्रकारे मरगळ आली आहे. पथकांमध्ये आलेली ही मरगळ वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

उच्च पदस्थांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे स्तरावर गुन्हे दाखल करण्याचा धडाका सुरू आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपी शोधण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वॉन्टेड आरोपींच्या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आयुक्तलयातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक डीबी (तपास) पथक आहे. या पथकाला पोलीस ठाण्याचे नाक समजले जाते.

सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची या पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाते. तसेच, दहा ते पंधरा कर्मचार्‍यांची पथकात नेमणूक केली जाते. हद्दीची व गुन्हेगारांची इतंभूत माहिती असणार्‍या कर्मचार्‍यांना या पथकामध्ये घेणे अपेक्षित असते.

मात्र, अलीकडच्या काळात अधिकार्‍यांच्या मागे-पुढे करणार्‍यांची या पथकामध्ये जास्त प्रमाणात भरती असल्याचे दिसून येते. परिणामी डीबी पथकांच्या कामगिरीवर मोठा परिणाम जाणवू लागला आहे.

हद्दीमध्ये एखादा गुन्हा घडल्यास डीबी पथकातील कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचणे महत्वाचे असते. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित गुन्हेगारांची उचलबांगडी करून चौकशीअंती गुन्हा उघड करण्याची सर्वस्वी जबाबदारी डीबी पथकाची असते.

मात्र, अलीकडच्या काळात गंभीर गुन्हा वगळता डीबी पथकातील कर्मचारी घटनास्थळी फिरकतही नसल्याचे चित्र आहे. गुन्हेगाराला फरफटत आणण्यापेक्षा पोलीस ठाण्यात बसून मध्यस्थांमार्फत आरोपी हजर करण्याला पसंती दिली जात आहे.

त्यामुळे आरोपींना या डीबी पथकांची भीती उरली नाही. काही ठिकाणी तर गुन्हेगारांना डीबी पथकाकडे हजर होणे 'सेफ' वाटू लागले आहे. पोलिसांनी अवलंबलेल्या या कार्यपद्धतीमुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ लागला आहे.

'त्या' सात खुनांचे गूढ उलगडेना

गेल्या वर्षी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खुनाच्या 85 घटना घडल्या. यातील सात गुन्ह्यांमध्ये खुनाचे कारण तसेच त्यातील आरोपी निष्पन्न झाले नाही. यामध्ये स्थानिक डीबी पथकांसह गुन्हे शाखादेखील अपयशी ठरली आहे. या प्रकरणांमध्ये सुरुवातीच्या काळात तपासाला योग्य दिशा न मिळाल्याने तपास भरकटला आहे. परिणामी खुनासारखे कांड करूनही आरोपी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत.

पथकांमध्ये वशिल्याचे 'तट्टू'

डीबी पथकाचे प्रमुख हे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या मर्जीतील असतात. मात्र, अलीकडे डीबी प्रमुख म्हणून नियुक्ती होण्यासाठी राजकीय पदाधिकार्‍यांकडून वशिला लावला जात आहे. त्यामुळे योग्यता नसलेल्या अधिकार्‍यांकडे पथकांची धुरा असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.

पथकाचे दुखणे…

पिंपरी- चिंचवड आयुक्तालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याने तपास पथकातील पोलिसांना सर्व कामे करावी लागतात. किचकट गुन्ह्यांचा उलगडा करीत असताना त्यांच्याकडे तपासासाठी काही गुन्हे देखील देण्यात आले आहेत. याशिवाय बंदोबस्त ठिकाणी देखील पथकातील कर्मचारी नियुक्त केले जातात. तसेच, हद्दीत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याच्या घटनास्थळी पथकातील पोलिसांना पाठवावे लागते. त्यामुळे प्रत्यक्षात पथकात नियुक्त असलेले संख्याबळ यापैकी काही मोजकेच पोलिस शिल्लक राहत असल्याचे पथक प्रमुख नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात.

पोलिस ठाण्यातील तपास पथकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठाण्याच्या तपास पथकाची कामगिरी असमाधानकारक असेल, अशा पथकांतील अधिकारी व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत. तसेच, आगामी काळात गुन्हे शाखेतही काही बदल करण्यात येणार आहेत.
– कृष्ण प्रकाश,पोलिस आयुक्त पिंपरी- चिंचवड

SCROLL FOR NEXT