पुणे

पिंपरी- सिव्हील कोर्ट मेट्रो डिसेंबरमध्ये धावणार, महामेट्रोचा दावा

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी ते पुण्यातील सिव्हील कोर्टदरम्यानच्या मार्गावर मेट्रो डिसेंबर महिन्यात धावणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे, असा दावा महामेट्रोने शुक्रवारी (दि. 21) केला आहे.

शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतर मेट्रो 6 मार्च 2022 पासून धावत आहे. फुगेवाडी ते दापोडी मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. मेट्रो कामासंदर्भात माहिती महामेट्रो प्रशासनातर्फे शुक्रवारी (दि.21)
देण्यात आली.

महामेट्रोचे सरव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, पिंपरी ते फुगेवाडीच्या पुढे दापोडी, बोपोडी, खडकी स्टेशन, रेंजहिल्स, शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट या मार्गावर वेगात कामे सुरू आहेत. त्या मार्गाचे काम 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर मेट्रोची पिंपरी ते सिव्हील कोर्ट अशी चाचणी घेण्यात येणार आहे. कमिश्नर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) अंतिम परवानगीनंतर साधारण डिसेंबर महिन्यात त्या मार्गावरून मेट्रो प्रवाशांसाठी धावेल. मेट्रो टप्पाटप्प्याने सुरू न करता थेट सिव्हील कोर्ट स्टेशनपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वनाज ते सिव्हील कोर्ट या मार्गावरही मेट्रो धावणार आहे. त्या प्रवासाचा तिकीट दर 30 रुपये असणार आहे.

नाशिक फाटा येथील कास्टिंग यार्डचे काम पूर्ण

पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गासाठी अवजड असे सेगमेंट व डक तयार करण्याचे काम नाशिक फाटा उड्डाण पुलाशेजारील पिंपळे गुरव भागातील जागेतील कास्टिंग यार्डमध्ये सुरू आहे. तेथे या मार्गावरील सर्व सेगमेंट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे यार्ड बंद केले जाणार आहे. मात्र, पिंपरी ते निगडी या विस्तारीत मार्गास लवकर मंजुरी मिळाल्यास यार्ड पुन्हा सुरू केले जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

नाव बदलण्याचा प्रस्ताव राज्याकडे

भोसरी स्टेशन हे नाव बदलून नाशिक फाटा स्टेशन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याबाबत संबंधित महापालिकेस शासन निर्देश देऊ शकते, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

उत्पन्न वाढीसाठी जाहिरात धोरण

मेट्रोचे अर्धे उत्पन्न प्रवासी भांडे तिकिटातून वसूल होते. उर्वरित उत्पन्न जाहिरात व इतर माध्यमातून जमविले जाणार आहे. स्टेशनच्या पादचारी मार्गावर तसेच, मार्गिकेच्या दोन पिलरमधील जागेत जाहिरात फलक लावले जाणार आहेत. तसेच, स्टेशनला कंपनी किंवा आस्थापनेचे नाव देऊन को-ब्रॅंडिंग केले जाणार आहे. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनचे नाव 'संत तुकाराम नगर- सॅण्डविक अ‍ॅशिया' असे करण्यात येणार आहे.

रेंजहिल्स मेट्रो स्टेशन वगळले

पिंपरी ते सिव्हील कोर्ट या मार्गावरील रेंजहिल्स येथील मेट्रो स्टेशन परिसरात लोकवस्ती विरळ आहे. तसेच, संरक्षण विभागाचा परिसर आहे. त्यामुळे सध्या रेंजहिल्स येथील स्टेशन बांधण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांना खडकी स्टेशन किंवा शिवाजीनगर स्टेशन येथून मेट्रोतून ये-जा करावी लागेल. रेंजहिल्स येथे मेट्रोचा प्रशस्त डेपो आहे.

500 रुपयांत फिरा महिनाभर 

पीएमपीएलप्रमाणे मेट्रोने प्रवाशांसाठी सवलत योजना घोषित केली आहे. पाचशे रुपये भरून कार्ड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला महिन्याभरात कोठेही कितीही वेळा फिरत येणार आहे. प्रवाशी संख्या वाढावी. त्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून मेट्रोने ही योजना सुरू केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT