पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेबांची शिवसेना व भाजप हे सहा महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेले डबल इंजिनचे सरकार राज्याचा वेगवान विकास करीत आहे. मंत्र्यांसह आमदारही झपाटून काम करीत आहेत. सर्वसामान्य लोकांचे हित साधत मुंबई शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात मूलभूत गरजा निर्माण करून कायापालट करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि.29) भोसरी येथे दिले. इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप कार्यक्रमास ते बोलत होते. या वेळी खा. श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आ. संजय शिरसाठ, भाजपचे शहराध्यक्ष तथा संयोजक आ. महेश लांडगे, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, माजी महापौर उषा ढोरे, राहुल जाधव, नितीन काळजे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, संतोष लोंढे, सदाशिव खाडे, पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना व भाजपचे सरकार 2019ला होणे अपेक्षित होते. मात्र, आमचे सरकार सहा महिन्यांपूर्वी आले. पूर्वी कोरोनाच्या नावाखाली कोणी घराबाहेर पडत नव्हते. घराबाहेर पडू नका, तिकडे जाऊ नका, असे सारखे सांगितले जात होते. वारंवार निर्बंध लादले जात होते. आमचे सरकार आल्यानंतर सर्व निर्बंध हटवले. दोन वर्षांनंतर नवरात्र, गणेशोत्सव, दहीहंडी, दिवाळी असे अनेक सण धुमधडाक्यात साजरे केले गेले. सर्व समाज घटकांसाठी वेगात कामे केले जात आहेत. थांबलेल्या कामांना मंजुरी देऊन कामांचा धडाका सुरू आहे. मंत्र्यांसह सर्व आमदार जीव तोडून काम करीत आहेत. लोकांसाठी काम करा, त्यांना न्याय मिळवून द्या. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ज्येष्ठ, महिला व बालगोपाळांसाठी आयोजित केलेल्या या जत्रेला तब्बल 20 लाख लोकांनी प्रतिसाद दिला आहे. या माध्यमातून महिला बचतगटांना व छोट्या उद्योजकांना बाजारपेठ मिळाला आहे. त्यातून मोठे उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जत्रेचे उद्घाटन केले. माझ्या उपस्थितीत समारोप होत आहे. मी आलो नसतो तर, जत्रेच्या आनंदापासून मुकलो असतो, असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक विकास डोळस यांनी स्वागत केले. आ. महेश लांडगे यांनी प्रास्ताविक केले. विजय फुगे यांनी आभार मानले. दरम्यान, अखेरचा दिवस व साप्ताहिक सुटी असल्याने जत्रेला नागरिकांनी सहकुटुंब तोबा गर्दी केली होती. छायाचित्र घेण्यासाठी शेकडो मोबाईल लकाकत होते. नागरिकांचा उत्साह भरभरून वाहत होता.
दाढीवाल्या पैलवानांची पारखच नाही
आ. महेश लांडगे निमंत्रणपत्रिका घेऊन जेव्हा माझ्याकडे आले. तेव्हा मी त्यांना सांगितले, 'हा भोसरीचा पैलवान कधी हारू शकत नाही. तो जिंकणार, मैदान मारणार,' असा विश्वास मी दिला. मीही दाढीवाला पैलवान आहे. मात्र, आमची पारख त्यांना करता आली नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.