पुणे

वाढत्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी टाटाच्या धरणातून पाणी घ्यावे लागेल

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढ होत आहे. येत्या 15 ते 20 वर्षांत पवना, आंद्रा व भामा आसखेड धरणाचे पाणी शहराला पुरेसे ठरणार नाही. शहरात पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. त्यासाठी लोणावळा परिसरातील वीजनिर्मिती करणार्‍या टाटा कंपनीच्या धरणांतून शहराला पाणी आणावे लागेल. तसेच, लोणावळ्यातील पावसाचे पाणी कोकणात जाऊन समुद्रात जाते. ते पाणी पाईपलाइनद्वारे शहरात आणावे लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.25) सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात पाणीप्रश्न भविष्यात गंभीर रूप धारण करणार आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी लोणावळा व परिसरातील टाटा कंपनीच्या धरणांतून पाणी आणावे लागेल. टाटाला सौर ऊर्जा, कचरा व इतर माध्यमातून तयार झालेली वीज महापालिकेस द्यावी लागणार आहे किंवा भरपाई द्यावी लागेल. त्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, लोणावळा परिसरात होणार्‍या पावसाचे पाण्याचा उपयोग होत नाही. ते पाणी समुद्रात जाऊन मिळते. महाराष्ट्र व कर्नाटक लवादाला अधीन राहून ते पाणी पाईपलाईनद्वारे शहरात आणले जाण्याचा विचार झाला पाहिजे.

अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राला अव्वल करणार

देशाची अर्थव्यवस्था दहावरून क्रमांक पाचवर आली आहे. देश क्रमांक तीनवर आणण्यासाठी 5 ट्रिलियन डॉलरवर अर्थव्यवस्था आणण्याचे ध्येय आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात परदेशी गुंतवणूक वाढविण्यात येत आहे. उत्पन्नाचे नवनवे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. तर, महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर नेण्यासाठी 1 ट्रिलियन डॉलरची (82 लाख 66 हजार कोटी) उलाढालीचे उद्दिष्टे आहे. या मोठ्या प्रमाणातील परदेशी गुंतवणुकीमुळे रोजगार वाढून बेरोजगारी कमी होणार आहे, असे पवार म्हणाले.

पवना बंद जलवाहिनीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

पवना बंद जलवाहिनीच्या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ती स्थगिती उठविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांनी स्थगिती उठविल्यानंतर पुढील काम सुरू करण्यास आयुक्त शेखर सिंह तयार आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

'चंद्रकांत यान' शब्दावरून पवारांची दिलगिरी

चंद्रयान मोहिमेऐवजी चंद्रकांत मोहीम असा शब्द चुकून गेला. कामाच्या व्यापात चुकून तो शब्द निघाला. त्याबाबत माफी मागत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

शरद पवारांबाबत 'नो कमेंट्स'

शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत आज वेगवेगळी वक्तव्य केले. त्यावर अजित पवार यांनी 'नो कमेंट्स' असे उत्तर दिले. विरोधकांच्या आरोपांना मी उत्तर देत नाही. मी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त असतो. महत्त्वाच्या विषयांवरील बैठकांचा मी सपाटा लावला आहे. सत्तेसाठी नव्हे, तर कामासाठी महायुतीत सहभागी झाल्याचा पुनर्रुच्चार त्यांनी केला. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कोरोना महामारीतही मी झोकून देऊन काम केले होते, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT