पुणे

Pimpari news : पाच हजार पैकी 200 कॅमेर्‍यांचा ‘वॉच’

अमृता चौगुले

पिंपरी : शहरात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि महापालिकेने तब्बल 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मागणीनुसार आणखी कॅमेरे बसविण्याचे काम महापालिकेतर्फे सुरूच आहे. असे असले तरी, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना केवळ 16 चौकांतीलच 200 कॅमेर्‍यांद्वारे नजर ठेवता येत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या तुलनेत पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड अजूनही मागे असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्मार्ट सिटी आणि महापालिकेने चौक, रूग्णालये, कार्यालये, शाळा, महाविद्यालये, उद्याने, बसस्थानक, महापुरूषांचे पुतळे, मंडई, बाजारपेठा, खाऊ गल्ली, नाट्यगृह, शॉपींग मॉल, अग्निशमन विभाग, प्रार्थना स्थळे, खेळांचे मैदाने असे वर्दळीचे ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याद्वारे संपूर्ण शहरावर 24 तास नजर ठेवण्यात येईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयास कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. तसेच, वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी कॅमेरे उपयुक्त ठरतील, असे सांगण्यात आले.

शहरभरात तब्बल 5 हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 16 ठिकाणचे कॅमेरे वाहतूक पोलिसांना उपयुक्त ठरत आहेत. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, नाशिक फाटा, कासारवाडी, दापोडी, भोसरी, वाकड, थेरगाव, महामार्ग अशा वर्दळीच्या 16 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक पोलिसांना मदत होत आहे. एका चौकात साधारण 10 ते 15 कॅमेरे असतात. असे एकूण 200 कॅमेरे वाहतूक नियम मोडणार्या वाहन चालकांवर नजर ठेवून आहेत.

या अशा प्रकाराचे अद्ययावत कॅमेरे आहेत की, ते वाहनांचा क्रमांक, रंग असे सुस्पष्ट चित्रीकरण रेकॉर्ड करते. तसेच, अंधारातही उत्तम दर्जाचे चित्रीकरण होते. वेगात वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, झेंब्रा काँसिंग पुढे वाहन लावणे, विनाकारण वाहन वाजविणे, लेन कटींग करणे, प्रमाणापेक्षा अधिक जणांना वाहनात बसविणे, धोकादायकरित्या वाहन चालविणे आदी नियमभंग करणार्या वाहनचालकांवर या कॅमेर्याद्वारे दंड होणार आहे. नियमभंग करणार्या वाहनचालकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कारवाईची माहिती पाठविली जाईल. त्यामुळे वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण कमी होणार आहे. पुणे शहरातील बहुतांश कॅमेर्यांद्वारे वाहतूक नियमाचे उल्लघंन केल्यास चित्रिकरण केले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर त्यामध्ये खूपच मागे आहे. शहरात प्रथमच 16 ठिकाणचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी होण्यासाठी बराच पल्ला गाठणे बाकी आहे. दरम्यान, पोलिसासाठी चिंचवड येथे नव्याने कंट्रोल सेंटर उभारण्यात येत आहे.

पोलिसांच्या मागणीनुसार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या संख्येत वाढ
पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत तब्बल 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिस तसेच, माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींकडून मागणी झाल्यानंतर नव्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात एक नवीन निविदा विद्युत विभागाने प्रसिद्ध केली आहे.

कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरद्वारे पोलिसांची शहरावर नजर
स्मार्ट सिटी व महापालिकेने लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे निगडी येथील संत तुकाराम महाराज क्रीडा संकुलातील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरला जोडण्यात आले आहेत. तेथून तब्बल 5 हजार कॅमेर्यांद्वारे महापालिकेचे अधिकारी विशेषत: पोलिस कर्मचारी शहरावर नजर ठेवतात. सर्व कॅमेरे हे वेगवेगळ्या प्रकाराचे आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व कॅमेरे सुरू केले जातील. त्याचा फायदा संपूर्ण शहराला होणार आहे, असे स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT