पुणे: झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी मालकीची आणि रेल्वेची चार एकर मोक्याची जागा लाटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ही जागा लाटण्यासाठी या जागेची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे कागदोपत्री जाणीवपूर्वक चुकीचे दाखविण्यात आले आहे. शिवाय या जागेचा सर्व्हे नंबरही मुद्दामहून चुकीचा दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात हा प्रकार उघडकीस आला आहे.
आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी सर्व्हे नंबर ३११ असल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात या जागेचा सर्व्हे नंबर २४२ इतका दाखवल्याचे या प्रकल्पाच्या कागदपत्रांतील नोंदीनुसार दिसून येत आहे.
हा प्रकल्प एकूण १६ हजार ११०.७६ चौरस मीटर म्हणजेच ४ एकर क्षेत्रावर हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प उभारला जात आहे. रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. वास्तुविशारदाचे काम एट्रीयन डिझाईन स्टुडिओ या कंपनीमार्फत केले जात आहे. या प्रकल्पातील झोपड्यांची संख्या १ हजार ८७ इतकी आहे.
एकाच वर्षात पुनर्वसन आदेश, प्रस्ताव दाखल अन् मंजुरी
या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठीचा प्रस्ताव दि. ४ जुलै २०२४ रोजी दाखल करण्यात आला असून, प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सव्वा महिन्यात म्हणजेच दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी काढण्यात आला आहे. पुनर्वसन आदेशानंतर अवघ्या १७ दिवसांत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
जागेचा सर्व्हे नंबर का बदलला?
या जागेचा सर्व्हे नंबर २४२ आहे. प्रत्यक्षात हा सर्व्हे नंबर ३११ दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या जागेचा सर्व्हे नंबर का बदलला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.