Pimpri Chinchwad politics Ajit Pawar: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या पक्षांतरामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली असून, भाजपनेते गिरीश महाजन यांनी त्यावर अत्यंत मिश्किल भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यातील अजित पवार गटाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "आम्ही मित्रपक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार किंवा पदाधिकारी आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत, असे ठरवले होते. तरीही आमच्या पक्षातले लोक घेतले गेले आहेत. पक्षातले लोक दुसऱ्या बाजूला गेल्यावर नाराज होणारच. या विषयावर मी मुंबईत गेल्यावर सविस्तर चर्चा करेन."
अजित पवारांच्या या नाराजीवर गिरीश महाजन यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, "एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन! सध्या नुसत्या प्रेमात आणि युद्धातच नाही, तर निवडणुकीतही सगळं काही माफ असतं. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं आणि आम्ही आमच्या पद्धतीने."
महाजन पुढे म्हणाले की, "महायुतीमध्ये एक ठरलं होतं की मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे, आमचे किंवा पवारांचे प्रमुख कार्यकर्ते एकमेकांनी घेऊ नयेत. पण जर कोणीतरी सुरुवात केली आणि एक घेतला, की मग समोरून दोन घेतले जातात आणि तिकडून तीन! मला वाटतं हे योग्य नाही, पण शेवटी निवडणुकीत या गोष्टी घडतच असतात."