दीपेश सुराणा :
पिंपरी : शहरामध्ये सध्या महापालिकेचे 30 दवाखाने आणि 8 रुग्णालये कार्यरत आहेत. इतक्या मर्यादित वैद्यकीय सेवेवरच सध्या शहरातील आरोग्य व्यवस्थेचा गाडा हाकला जात आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार प्रति 30 हजार लोकसंख्येमागे 1 प्राथमिक आरोग्य केंद्र तर, प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 उपकेंद्र असायला हवेत. शहराची लोकसंख्या 27 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे या निकषानुसार शहरात किमान 90 दवाखाने असायला हवेत.
निकषाची पूर्तता करण्यात पालिका अपयशी
या निकषाची पूर्तता करण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. पर्यायाने नागरिकांना महागड्या खासगी वैद्यकीय सेवेचा पर्याय निवडावा लागत आहे. महापालिकेकडून पिंपरी-संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) हे जवळपास 750 खाटा इतकी क्षमता असणारे रुग्णालय चालविण्यात येते. या रुग्णालयावर सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत होता. मात्र, महापालिका प्रशासनाने आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण करत शहरातील विविध भागांमध्ये नव्याने रुग्णालये सुरू केली आहेत. त्यामध्ये नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन आकुर्डी रुग्णालय तसेच, अजमेरा कॉलनी येथील नेत्र रुग्णालय आदींचा समावेश आहे.
तालेरा रुग्णालय सुरू होण्यास सहा महिन्यांचा अवधी
ही रुग्णालये सुरू झाल्याने वायसीएम रुग्णालयावरील ताण हलका झाला आहे. जुन्या तालेरा रुग्णालयाची इमारत पाडून नवीन तालेरा रुग्णालयाची इमारत उभी राहिली आहे. मात्र, येथे अन्य कामे बाकी असल्याने हे रुग्णालय सुरू होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
वायसीएमला अपयश
वाढत्या रुग्णसेवेच्या तुलनेत पुरेशी वैद्यकीय सेवा पुरविण्यात महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला अपयश येत आहे. रुग्णालयामध्ये पिंपरी-चिंचवड परिसराबरोबरच शहराबाहेरील खेड, मंचर, मावळ, मुळशी येथूनदेखील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज दीड ते दोन हजार रुग्णांची तपासणी केली जात आहे.
वास्तव चित्र वेगळेच
शहराच्या़ नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विस्तारदेखील होत आहे. सध्या पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार, सर्वसाधारण प्रदेशात प्रत्येक 30 हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर, प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 उपकेंद्र असायला हवे. त्यानुसार विचार करता शहरामध्ये किमान 90 प्राथमिक आरोग्य केंद्र असायला हवेत. सध्या महापालिकेचे 30 दवाखाने आणि 8 रुग्णालये कार्यरत आहेत. प्रत्येक रुग्णालयाची क्षमता 5 दवाखान्यांइतकी गृहीत धरली आणि त्यानुसार विचार केला तरीही शहराला असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज भागत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे.
मनपा दवाखान्यांमध्ये सुविधा अपुर्या
महापालिकेच्या़ दवाखान्यांमध्ये सध्या देण्यात येणार्या सुविधा अपुर्या आहेत. त्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेण्याकडे रुग्णांचा कल असतो. दवाखान्यांमध्ये सध्या केवळ बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध आहे. बाह्यरुग्ण विभागात काही तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एकदा तर काही तज्ज्ञ डॉक्टर महिन्यातून एकदा उपलब्ध होत असतात. त्याशिवाय, दवाखान्यात तपासणीसाठी येणार्या रुग्णांना बसण्यासाठीदेखील जागा अपुरी पडते.
महापालिकेचे दवाखाने कोठे उपलब्ध?
संभाजीनगर, घरकुल (चिखली), दत्तनगर, जाधववाडी, रुपीनगर, तळवडे, प्राधिकरण, म्हेत्रेवस्ती, मोशी, चर्होली, दिघी, बोपखेल, नेहरुनगर, खराळवाडी, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, भाटनगर, काळेवाडी, पिंपरी वाघेरे, पिंपळे सौदागर, प्रेमलोक पार्क, चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, किवळे, पुनावळे, खिंवसरा पाटील दवाखाना (थेरगाव), पिंपळे निलख आदी परिसरात.
शहरातील महापालिकेची रुग्णालये
यशवंतराव चव्हाण रुग्णालय (संत तुकारामनगर), यमुनानगर रुग्णालय (यमुनानगर), नवीन भोसरी रुग्णालय (भोसरी), हभप मल्हारराव कुटे रुग्णालय (आकुर्डी), सांगवी रुग्णालय (सांगवी), नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (चिंचवडगाव), नवीन थेरगाव रुग्णालय (थेरगाव).
शहराच्या लोकसंख्येचा विचार करता महापालिकेकडे सध्या रुग्णालये व दवाखाने पुरेसे आहेत. महापालिकेकडून शहरातील विविध भागात आणखी 25 दवाखाने प्रस्तावित केले आहेत. बीआरटीएस प्रकल्प विभागाकडे त्याबाबत मागणी केलेली आहे. त्यातील 10 दवाखान्यांचे काम चालू केले आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका