पिंपरी : भाजपचा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका उमा खापरे यांना भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी 8 जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यास त्या पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या महिला आमदार ठरणार आहेत.
विधान परिषदेसाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड अशी पाच नावे आहेत.त्या पालिकेत 10 वर्ष नगरसेविका होत्या. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी भाजप प्रदेश व जिल्हा पातळीवर विविध पदावर अनेक वर्षे काम केले आहे.
सध्या त्या भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या गोपीनाथ मुंडे गटाच्या समर्थक मानल्या जातात. त्यांना आमदारकीची संधी दिल्याने शहर भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांस न्याय दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. खापरे यांचे अभिनंदन करण्यासाठी चिंचवड येथील निवासस्थानी आज दिवसभर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
त्या आमदार झाल्यास शहरातील पहिल्या महिला आमदार असतील. शहरातील त्या चौथ्या आमदार तर, भाजपच्या तिसर्या आमदार असतील. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड भाजपची ताकद वाढवेल.
न मागता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्तीला आमदारपदाची संधी दिली आहे. या माध्यमातून मी विशेषत: उपेक्षित असलेल्या महिला भगिणींच्या कल्याणासाठी काम करणार आहे. संधी दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभारी आहे, अशी प्रतिक्रिया उमा खापरे यांनी दिली.
हेही वाचा