Shirur Taluka Leopard Attack
पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील नागरिकांसाठी आता बिबट्याचा हल्ला फक्त भीतीचा विषय राहिला नाही, तर प्रत्यक्ष जीवनावरील संकट बनला आहे. नरभक्षक बिबट्या मानेवर हल्ला करत असल्याने, येथील काही शेतकरी महिलांनी अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी गळ्यात टोकदार खिळे असलेला संरक्षक पट्टा घालून शेतात काम सुरू केले आहे. हा आगळावेगळा उपाय त्यांचा जीव वाचविण्यासाठी केला खरा; मात्र शासन आणि वन विभागाकडून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांप्रश्नी होत असलेल्या नाकर्तेपणामुळे ‘गळ्यात पट्टा’ घालण्याची वेळ आल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.
शेतात वाकून जनावरांचा चारा काढणे, ऊसतोड करणे किंवा इतर कामे करताना बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता अधिक असते. या वेळी बिबट्या हल्ला करताना थेट मानेचाच वेध घेतो, हे लक्षात घेऊन पिंपरखेड येथील महिला व शेतकऱ्यांनी बचावासाठी हा उपाय अवलंबला आहे. जनावरे किंवा पाळीव कुत्रे यांच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे खिळे/तारे असलेले पट्टे उषा ज्ञानेश्वर ढोमे, सुनिता संतोष ढोमे आणि श्रीपत झिंजाड यांनी आपल्या गळ्यात वापरण्यास सुरुवात केली आहे.
शेतात काम केल्याशिवाय आमचं पोट भरणार नाही. जीव धोक्यात घालून काम करावं लागत आहे. बिबट्याचा हल्ला मानेवर होतो, म्हणून नाईलाजाने आम्हाला हा पट्टा गळ्यात घालावा लागला आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसरा पर्याय नाही.सुनीता ढोमे, शेतकरी
‘आमचा पाळीव कुत्रा टोकदार खिळ्यांच्या पट्ट्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला आहे, त्यामुळे बचावासाठी आम्ही देखील शेतात काम करताना टोकदार खिळ्यांचा पट्टा घालत आहोत.’संतोष ढोमे, शेतकरी
ग्रामस्थांना हा उपाय करावा लागणे, हे प्रशासनाचे आणि वन विभागाच्या उपाययोजनांचे अपयश स्पष्ट करते, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. जीव वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आणि महिलांना अशा पद्धतीने स्व-संरक्षणाचे ‘साधन’ वापरावे लागणे हे अत्यंत लाजिरवाणे चित्र असल्याची चर्चा आहे.