पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वन विभागाला एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पशुधनाची हानी होत असून पारगाव रोड परिसरात भीतीचे सावट होते. एक बिबट्या पकडला असला तरी परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याने ग््राामस्थांनी वन विभागाने तत्काळ पिंजरे लावून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
शेतकरी रामहरी नामदेव बोंबे यांच्या घराच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला. पकडलेला बिबट्या अंदाजे 6 वर्षांचा नर असून त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवले. याबाबतची माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली.
दरम्यान, परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. ऊसतोडणी हंगाम सुरू झाल्याने शेतात काम करताना शेतकरी व ग््राामस्थांना अतिरिक्त धोक्याचा सामना करावा लागत आहे.
बिबट्यांचा वाढता वावर पाहता वन विभागाने गस्त वाढवावी, अधिक पिंजरे बसवून तत्काळ पकड मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.