आळेफाटा: पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे साडेनऊवर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. २०) सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळला.
गुरुवारचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मंगळवारी (दि. १८) पिंपळवंडी गावठाणात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आळेफाटा पोलिसांनी संशयिताला तातडीने अटक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत तातडीने तपासाला सुरुवात केली.
या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि. १९) सकाळपासून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळवंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
चिमुकलीच्या कुटुंबीयांचे शासनाने योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. प्रशासनाकडून योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. बुधवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व निष्पक्षपणे करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, गुरुवारी देखील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले असून, आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आला. सायंकाळी ग्रामस्थांच्या वतीने मूक मोर्चा व कँडल मार्च काढण्यात येणार आहे. त्यानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षकांकडून पुन्हा घटनास्थळाची पाहणी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी गुरुवारी दुपारनंतर पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांनी चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.