तळजाई टेकडीवर वराहपालनाचा नवा फंडा Pudhari
पुणे

तळजाई टेकडीवर वराहपालनाचा नवा फंडा

वन प्रशासनाने चारवेळा दिले पत्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहराची फुप्फुसे म्हणून टेकड्यांकडे पाहिले जाते. मात्र, अलीकडच्या काही दिवसांमध्ये वराहपालन करणार्‍या व्यावसायिकांनी तळजाई टेकडीवर व्यवसायाचा नवा फंडा अवलंबिला आहे. वनप्रेमींनी मोरांसाठी टाकलेल्या खाद्यावर वराह सोडले जातात. त्यामुळे वराहांवर होणार्‍या खर्चाची बचत होते. याबाबत वन विभागाच्या वतीने महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही प्रशासनाला हा विषय डोईजड होत असल्याची भावना वनप्रेमींनी व्यक्त केली आहे.

वन विभागाच्या हद्दीत असलेल्या तळजाई टेकडीवर पक्ष्यांबरोबरच मोठ्या प्रमाणात प्राणी दिसून येतात. त्याठिकाणी असलेल्या मोरांना टेकडीवर फिरायला येणारे वनप्रेमी रोज खाद्य टाकतात. मोरांना देण्यात येणार्‍या खाद्यावर आता वराहांनीच कब्जा केल्याचे दिसून येत आहे. त्या परिसरात असलेल्या वराह व्यावसायिकाने वराह पालनाचा नवा फंडा अवलंबिला असून, हे वराह तळजाईवर खाण्यासाठी सोडून दिले जातात.

मोरांचे खाद्य हे वराह फस्त करीत असून, व्यावसायिक मात्र त्यातून आपली उपजीविका करीत असल्याच्या तक्रारी काही वनप्रेमींनी वन विभागाकडे केली आहे. दरम्यान, वन विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणीतून पुणे महापालिकेला त्याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे. मात्र, मनपा प्रशासनाला हा विषय डोईजोड होत असून, या कारवाईकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम म्हणजे मोर व इतर पक्ष्यांना टाकण्यात येणार्‍या अन्नावर वराहच ताव मारत आहेत.

तळजाईच्या बाजूने या वराहांना आतमध्ये सोडले जाते. त्यांना पकडल्यानंतर संबंधित वराह व्यावसायिक आमचे वराह नाहीत तुम्हाला कारवाई करायची तर करा, असे बोलून हात वर करतात. याबाबत महापालिका प्रशासनाला कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
- रोहिणी घाडगे, वनरक्षक, तळजाई टेकडी
तळजाईच्या बाजूने संरक्षक भिंत नाही. ही भिंत उभी करण्याबाबत वन विभागाकडे पत्रव्यवहार करून निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळताच संपूर्ण भिंत उभी केली जाणार आहे. तोपर्यंत वन विभागाच्या वतीने आत्तापर्यंत तीन ते चार पत्र महापालिका प्रशासनाला दिलेली असून, कारवाई करण्याची विनंती केलेली आहे. परंतु, मनपा प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे तळजाईवरील वराहांमुळे मोरांबरोबरच इतर वन संपदेचे नुकसान होत आहे.
- मनोज बारबोले, वन अधिकारी, भांबुर्डा वनपरिक्षेत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT