पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फूड कोर्टमध्ये चायनीज गाळ्यावर घेतलेल्या जेवणात चक्क रबर सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणारा असून, यावर विद्यापीठाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
हिंदी विभागाचे विद्यार्थी या ठिकाणी चायनीज पदार्थ खाण्यासाठी म्हणून चायनीज गाळ्यावर गेले. फ्राइड राइस व नूडल्सची त्यांनी ऑर्डर दिली. ते खात असताना अचानक रबर आढळून आले. (Latest Pune News)
विद्यापीठाच्या फूड कोर्टमध्ये विकल्या जाणार्या पदार्थांच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी केल्या जातात; परंतु विद्यापीठ प्रशासन याकडे गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे दाद नेमकी कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील गाळ्यांमध्ये सातत्याने झुरळ, आळी, प्लास्टिक तुकडे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत आणि आता रूट 99 या गाळ्यात जेवणाच्या ताटात रबर सापडले आहे. संबंधित चालकाचे टेंडर रद्द करावे, अशी आमची मागणी आहे.- रोहित भामरे, विद्यार्थी कार्यकर्ता
मी हिंदी विभागाची विद्यार्थिनी आहे. विद्यापीठाच्या फूड कोर्टमध्ये एका गाळ्यात चायनीज पदार्थ विकले जातात. या ठिकाणी मी व्हेज शेजवान नूडल्स मागवले होते. मी ते खात असताना एक घास कठीण लागल्यानंतर बाहेर काढल्यावर लक्षात आले, त्यामध्ये रबर आहे. याअगोदर पण या ठिकाणी फ्राइड राईसमध्ये माशी निघाली होती. संबंधित गाळ्यात वारंवार अशा घटना घडत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.- एक विद्यार्थिनी, हिंदी विभाग