फुरसुंगी, पुढारी वृत्तसेवा: हवेली कृती समितीमुळेच आमच्या गावचे वाटोळे झाले आहे. आमच्या गावाचा निर्णय घेण्याचा अधिकार यांना कोणी दिला? कृती समितीकडे आमच्या गावची मालकी आहे का? तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करून घ्या की हडपसर महापालिका. आम्हाला त्यामध्ये उगीच का ओढताय?, आमच्या गावाचा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असे ठणकावत फुरसुंगी ग्रामस्थांनी हवेली कृती समितीवर टीका केली आहे.
कृती समितीच्या आग्रहामुळेच सुरुवातीला ११ व त्यानंतर २३ गावे महापालिकेत सामाविष्ट केली गेली. नंतर विकास कामे होत नाही म्हणून आता कृती समिती पुणे मनपाच्या नावाने ओरडताना दिसत आहे. खरे तर या ३४ गावांत भरमसाट जाचक कर आकारणी झाली, पाणी समस्या निर्माण झाली. चांगले रस्ते, ड्रेनेज, लाईट मिळाले नाहीत, आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत, माणूस मृत झाल्यावर त्या मयताच्या पासेससाठी पळापळ करावी लागली अशा विविध अडचणी असताना कृती समिती कुठे गेली होती, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी विशाल हरपळे, ज्ञानेश्वर कामठे, नीलेश पवार, गणेश कामठे, राहुल हरपळे, धनंजय कामठे, भाऊसाहेब पवार, कामठे, , महेश चोरघडे, सुनील भाडळे, चेतन शेवाळे, मंगेश निकम, अभिजित खराडे, मंगेश फाटे, विकास कार्हाळे, दुर्योधन कामठे, काका खराडे,संदीप हरपळे, नंदू चौधरी, संतोष हरपळे आबा सायकर उपस्थित होते.