Mahatma Phule Wada, Ganj Peth, Pune
महात्मा फुले वाडा, गंज पेठ, पुणे File Photo
पुणे

फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण प्रक्रियेला वेग

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि महात्मा फुले पेठेतील फुले वाडा या दोन स्मारकांच्या वास्तूंचे एकत्रिकरण करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या वास्तूंच्या एकत्रिकरणासाठी तयार करण्यात येणार्‍या कॉरीडोरसाठी 10 हजार 942 चौरस फूट जागेची आवश्यकता असून ती संपादित करण्यासाठी पालिका प्रशासन जागामालक, भाडेकरू यांच्याशी चर्चा सुरू करणार आहे.

रहिवाशांचा प्रश्न मार्गी कसा लावणार?

महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक एकत्र करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात यासंबंधीची आढावा बैठक घेतली. त्यात या दोन्ही वास्तूंच्या दीडशे मीटर अंतरामध्ये अनेक घरे आहेत, त्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लागू शकलेला नव्हता. त्यावर स्मारकासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु करावी अशा सुचना पालिका प्रशासनाला दिल्या. त्यानुसार आता पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

रहिवांशांचा इतर भागात स्थलांतराला नकार

या दोन्ही वास्तु एकत्रित करण्यासाठी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात या परिसरात 516 जमीन मालक असून, 286 भाडेकरू आहेत. त्यानुसार दोन्ही वास्तुंच्या कॉरीडोरसाठी 10 हजार 942 चौरस मीटर जागा संपादित करणे आवश्यक आहे. साठी सर्व जागा मालक आणि भाडेकरू यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यासर्वांनी या भागातच त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे अशी भुमिका घेतली आहे. यासर्वांशी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि भवन विभागाचे अधिकारी प्राथमिक चर्चा करणार आहेत. त्यानंतर महापालिका आयुक्त, शहर अभियंता हे सुध्दा यासर्वांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करणार आहेत.

महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एकत्र करण्यासाठी राज्य शासनाने आरक्षणात बदल केला आहे. स्मारकासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी येथील रहिवाशांसोबत सामंजस्याने चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो मोबदला सर्वांना दिला जाईल. या स्मारकाचे भूसंपादन आणि स्मारक उभारणीचे काम राज्य सरकारकडून केले जाणार आहे.
डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका
SCROLL FOR NEXT