पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात टप्प्याटप्प्याने ट्रॉमा केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. ट्रॉमा केअर सेंटरसाठी रुग्णालयात एकूण 10 शस्त्रक्रिया कक्ष असणे गरजेचे आहे. तथापि, रुग्णालयात सध्या 2 शस्त्रक्रिया कक्ष आहेत. पहिल्या टप्प्यात नव्याने 4 शस्त्रक्रिया कक्ष सुरु केले जाणार आहे. तर, दुसर्या टप्प्यात आणखी 4 शस्त्रक्रिया कक्ष वाढविण्याचे नियोजन आहे.
अपघात झाल्यानंतर किंवा शरीराला कोणत्याही कारणाने जखम झाली असेल तर अशा वेळी ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेतले जातात त्याला ट्रॉमा रुग्णालय किंवा ट्रॉमा केअर सेंटर म्हणतात. शासकीय आणि खासगी अशा दोन्ही प्रकारचे ट्रॉमा केअर सेंटर असतात. खासगी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपचार परवडत नाही. त्यामुळे शासकीय ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत. ट्रॉमा केअर सेंटरसाठी 10 शस्त्रक्रिया कक्ष सुरु करण्याबरोबरच विविध शस्त्रक्रियांसाठी लागणारे साहित्य व यंत्रसामग्री खरेदी करावी लागणार आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची गरज
अपघातामध्ये रुग्णाच्या शरीरावरील कोणत्याही भागावर इजा होऊ शकते. त्यामुळे अपघात झालेले रुग्ण ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासणार आहे. त्यामुळे प्राधान्याने तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करावी लागणार आहे. रुग्णालयात न्युरोसर्जन, कार्डिओथोरॅसिक सर्जन, व्हॅस्क्युलर सर्जन (रक्तवाहिन्यांसबंधी शल्यविशारद) असे तज्ज्ञ डॉक्टर घ्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे, गरजेनुसार परिचारिका व अन्य रुग्णालयीन कर्मचार्यांची संख्या देखील वाढवावी लागणार आहे.
नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागणार आहे. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. तथापि, त्यासाठी 10 शस्त्रक्रिया कक्ष, शस्त्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामग्री व साहित्य, विविध तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी असे मनुष्यबळ लागणार आहे. त्याची पुर्तता झाल्यानंतर हे सेंटर सुरु होऊ शकेल.
– अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, नवीन थेरगाव रुग्णालय.