मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत ग्रामीण विकासाचा कणा आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य या लोकप्रतिनिधींनी राजकारणविरहित काम करून गावचा विकास केला पाहिजे, असे मत शारदा प्रबोधिनीचे ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले यांनी व्यक्त केले. घोडेगाव येथील श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पतसंस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख व पतसंस्थेच्या विशेष योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम भास्कर होते. या वेळी कैलासबुवा काळे, सोमनाथ काळे, क्रांतीताई गाढवे, सावता पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांची मनोगते झाली.
या वेळी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत माहिती देत असताना शारदा प्रबोधिनीचे ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले म्हणाले की, घोडेगावातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार व्हावा व गावातील आरोग्य, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. सखाराम पाटील काळे, पांडुरंग अभंग, देवराम बेल्हवरे, डॉ. केशव काळे, श्याम होनराव, सुरेश दिवेकर तसेच नवनिर्वाचित सरपंच अश्विनी तिटकारे, प्रशांत काळे, राजेश काळे, विजय काळे, ज्योती घोडेकर, रूपाली झोडगे, रत्ना गाडे आदी या वेळी उपस्थित होते.