आज आम्ही जे आहोत ते केवळ तुमच्या प्रेमामुळे आहोत. हे आम्ही कधीच विसरणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी जे जे करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खा. सुनेत्रा पवार यांनी सांगितले. आपल्या तालुक्यात इतके काम करूनही लोकांना त्याची तमा नाही, अशा शब्दांत त्यांनी लोकसभेतील पराभवाची खंत व्यक्त केली.
चोपडज (ता. बारामती) येथे 1 कोटी 5 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान भोर, मुळशी, वेल्ह्याच्या दुर्गम भागात गेले होते. त्या भागातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात लाखो रुपयांची कामे झाल्याचे समजले. मात्र, निकालानंतर खूप अभ्यास केला. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारे उपमुख्यमंत्री पवार हे एकमेव नेते आहेत. राज्यात इतर कुणी इतके काम करते का ? यात दादांचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे का ? ते जीव ओतून काम करतात. मात्र, आपल्या लोकांना त्याची कदर नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, समाजकारण करताना मी आता राजकारणी बनतेय. आता मीही खासदार झालेय. त्यामुळे तुमच्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. विकासकामांवर लक्ष देऊन चांगली कामे करू घ्या, अशी सूचना त्यांनी केली. या वेळी सरपंच रुक्मिणी पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्तविक सागर गायकवाड यांनी केले. आभार संदीप गाडेकर यांनी मानले.