पुणे: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने तिघांची 70 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडक, सिंहगड रोड आणि वारजे पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत व्यापार्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भवानी पेठेतील टिंबर मर्चंट कॉलनीत राहयला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या वर्षी मेसेज पाठविला होता. (Latest Pune News)
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सुरुवातीला पैसे गुंतवल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर व्यापार्याने वेळोवेळी 38 लाख 24 हजार रुपये गुंतविले. मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत. अशाच पद्धतीने कर्वेनगर भागातील 53 वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी 17 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चोरट्यांनी वेळोवेळी रक्कम बँक खात्यात जमा करून घेतली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे तपास करत आहेत. तिसर्या घटनेत नर्हेतील 30 वर्षीय तरुणाला सायबर चोरट्यांनी 14 लाख 70 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी तरुणाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेअर खरेदी-विक्रीमध्ये मोठा नफा मिळेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, त्यानंतर तरुणाला ना गुंतवणूक केलेले पैसे परत दिले ना नफा दिला.