बारामती: शहरातील मिळकतधारकांना वेळोवेळी सूचना देत, बिल मागणीपत्र देऊनही वेळेत कर भरणा न करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. नागरिकांनी थकीत कराचा वेळेत भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
नगरपरिषदेने थकीत मिळकतधारकांना मागील वित्तीय वर्षातील अधिपत्र बजावले आहे. याशिवाय अधिकारी-कर्मचार्यांनी वारंवार घरभेटी देऊन मालमत्ताधारकांकडे कर भरणा करावा, अशी मागणी केली आहे.
परंतु, अद्याप अनेक थकीत मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे वसुली पथके व जप्ती पथकाव्दारे थकीत मालमत्ताधारकांवर धडक कारवाई करून मालमत्ता सील करणे, जप्त करणे, जप्त केलेला माल अटकाव करणे, अशी कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टीची बिले भरण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सोय करून देण्यात आली आहे. याशिवाय इठच ढअद हे अॅप विकसित करण्यात आले आहे. विविध बँकांच्या क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे नागरिक भरणा करू शकतात किंवा आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, एसआय वॉलेटद्वारेही भरणा केला जाऊ शकतो.
याशिवाय फक्त क्यूआर कोड स्कॅन करून मालमत्ता कर भरला जाऊ शकतो. नागरी सुविधा केंद्रांमध्येही कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. थकीत घरपट्टी, पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करत कटू कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.