पुणे

वडगावकरांनो सावधान ! मिळकतकर वेळेत भरा, अन्यथा दरमहा 2 टक्के शास्तीकर लागणार

अमृता चौगुले

गणेश विनोदे

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत हद्दीतील मिळकतींच्या थकबाकीवर दरमहा 2 टक्केशास्तीकर लागू करण्यात आला आहे. नगरपंचायत स्थापनेनंतर बांधलेल्या व अनधिकृत नोंद असलेल्या मिळकतींना थेट मिळकत कराच्या दुप्पट शास्तीकर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना आपल्या मिळकतीचे कर 31 डिसेंबर अखेरपर्यंतच भरावे लागणार आहेत.
करात वाढ नाही

वडगाव नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षे होऊन गेली तरी अजूनही ग्रामपंचायत कराच्या दराप्रमाणेच मिळकत कर आकारला जात आहे. करामध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. यामध्ये घरपट्टी, वीज कर, आरोग्य कर, पाणीपट्टी या करांचा समावेश आहे. घरपट्टी ही संबंधित मिळकतीचे क्षेत्र, बांधकाम यानुसार आकारली जाते तर पाणीपट्टी ही सरसकट 1100 रुपये असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी सांगितले.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती अधिनियम 1965 चे कलम 150 क (1) अन्वये 1 एप्रिल 2022 पासून थकबाकीवर शास्तीकर लावण्यात आला आहे. मिळकत धारकाने मिळकत कर हा 31 डिसेंबर अखेरपर्यंत भरला तर शास्तीकर लागत नाही. परंतु, तो जानेवारीनंतर भरला तर दरमहा 2 टक्के दराने शास्तीकर आकारण्यात येत आहे. याशिवाय 2 टक्के शास्तीकर कर संबंधित महिन्याच्या पूर्ण रकमेवर आकारला जात असल्याने नागरिकांना चक्रवाढ पद्धतीने शास्तीकर भरावा लागणार आहे.

अनधिकृत मिळकतींना भरावा लागणार तिप्पट कर
ग्रामपंचायत काळात झालेल्या बांधकामांव्यतिरिक्त नगरपंचायत स्थापनेनंतर झालेल्या व अनधिकृत नोंद असलेल्या मिळकतींना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती अधिनियम 1965 चे कलम 189/1 अन्वये चालू मिळकत कराच्या दुप्पट शास्तीकर करण्यात येणार असल्याने संबंधित मिळकत धारकास चालू मिळकत कर हा तिप्पट भरावा लागणार आहे. (उदा.चालू मिळकत कर हा 1 हजार रुपये असेल तर दुप्पट शास्तीकर म्हणजे 2 हजार शास्तीकर व चालू मिळकत कर 1 हजार रुपये असे एकूण 3 हजार रुपये भरावे लागणार आहे.)

अद्याप साडेतीन कोटींची थकबाकी
दरम्यान, नगरपंचायतची चालू घरपट्टी व पाणीपट्टी सुमारे 2 कोटी तर थकबाकी सुमारे साडे तीन कोटी अशी एकूण सुमारे साडेपाच कोटींची थकबाकी होती. यापैकी सुमारे दोन कोटींची वसुली झाली असून, सुमारे साडेतीन कोटींची वसुली होणे बाकी आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून मिळकत कर वसुलीसाठी विशेष वसुली पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पाणीपट्टी दरामध्ये होणार बदल
यापूर्वी शहरातील सर्व मिळकतींना प्रत्येक नळ कनेक्शनसाठी सरसकट 1100 रुपये पाणीपट्टी आकारली जात होती. यापुढे मात्र घरगुती वापरासाठी 1200 रुपये, व्यावसायिक वापरासाठी 2400 रुपये व औद्योगिक वापरासाठी 3600 पाणीपट्टी आकारली जाणार आहे. तसेच, यापूर्वी घरगुती वापरासाठी एकापेक्षा अधिक नळ असले तरी प्रत्येकी 1100 रुपये पाणीपट्टी होती. आता मात्र घरगुती वापराच्या एका नळ कनेक्शनसाठी 1200 रुपये व एकापेक्षा अधिक नळ असल्यास अधिकच्या नळासाठी व्यावसायिक दराने म्हणजे 2400 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे.

मिळकत करावर आकारण्यात आलेला शास्तीकर व अनधिकृत बांधकामांवर आकारण्यात आलेला शास्तीकर हा नगरपरिषद, नगरपंचायती अधिनियम 1965 च्या कलमानुसार आकारण्यात आलेला आहे. यासाठी कुठलाही ठराव या विरोधात करता येणार नाही. तसेच, मंजुरीची आवश्यकता नाही. हा कर वरिष्ठ कार्यालयाकडील संगणक आज्ञावली आधारे असल्याने त्यात बदल होत नसतो. त्यामुळे नागरिकांनी आपला मिळकतकर वेळेवर व नियमानुसार भरावा अन्यथा शास्ती वाढत जाऊन कराची रक्कम वाढेल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून शहराच्या विकासाला हातभार लावावा ही विनंती.

             – डॉ .प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT