पुणे

पुणे : प्रशासक राजवटीतही ’पे अ‍ॅन्ड पार्क’ दुर्लक्षितच

अमृता चौगुले

हिरा सरवदे

पुणे : विरोधकांसह विविध संस्था व संघटनांचा विरोध असतानाही महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने विरोधाला न जुमानता बहुमताच्या जोरावर मंजूर केलेले पार्किंग धोरण महापालिकेतील प्रशासक राजमध्येही दुर्लक्षितच राहिले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पाच रस्त्यावर पे अ‍ॅन्ड पार्क राबविण्याच्या प्रस्तावाला पाच वर्षांनंतरही खास सभेची प्रतीक्षा आहे.

खासगी वाहनांची वाढती संख्या रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर 'पे अ‍ॅण्ड पार्क' धोरण राबविण्याचा घाट मार्च 2018 मध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने घातला होता. या धोरणाला स्थायी समितीची मंजुरीनेही दिल्यानंतर भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष आणि विविध समाजसेवी संस्थांनी विरोध करत जोरदार आंदोलने केली. महापालिकेबाहेर आणि आतमध्ये या विरोधात आंदोलन सुरू असताना, अगदी प्रवेशद्वारांना कुलूप लावून बहुमताच्या जोरावर मुख्य सभेत मंजुरी दिली.

या धोरणाला होणारा विरोध लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य सभेत उपसूचनेद्वारे शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क राबविण्याचा मार्ग अवलंबला. हे पाच रस्ते निवडण्याचा अधिकार महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील 38 रस्त्यांची यादी पक्षनेत्यांच्या सभेसमोर ठेवली. मात्र, सर्व स्तरातून टीका होऊ लागल्याने भाजप नगरसेवकांनीही पक्षाच्या बैठकीत धोरणाला विरोध केला. या धोरणासाठी पुणेकरांची नाराजी ओढवून घेऊ नये, असे मत अनेकांनी मांडले.

त्यामुळे हा विषय 2018 पासून अद्यापही अडगळीलाच पडून आहे. यासंदर्भात 18 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता. या बैठकीमध्ये हा विषयाचा निर्णय खास सभेत घेण्यात यावा, असे ठरवण्यात आले. त्यानंतर अद्यापपर्यंत या विषयाची खास सभा झालेलीच नाही. प्रशासकांनीही हा विषय दूर ठेवण्यालाच पसंदी दिली आहे.

यामधून निवडले जाणार 5 रस्ते

जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, ढोले पाटील रस्ता, नॉर्थ मेन रोड, कर्वे रस्ता, पौड रस्ता, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय रस्ता, बाणेर रस्ता, करिश्मा सोसायटी रस्ता, नदीपात्रातील रस्ता, बिबवेवाडी रस्ता, मार्केट यार्ड रस्ता, कोंढवा, कल्याणीनगर, विमाननगर, सिंहगड रस्ता यांसह एकूण 38 रस्त्यांची नावे प्रशासनाने पे अ‍ॅन्ड पार्किंगसाठी सुचविली आहेत. या रस्त्यांमधून 5 रस्ते महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीला निवडावे लागणार.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT