पुणे : रुग्णालयातील काही दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी एका कार्यक्रमास हजेरी लावलेल्या खासदार गिरीश बापट यांची भेट
होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'गिरीशजी तब्येत काय म्हणतेय, बरी आहे का सध्या? अशी आस्थेने विचारपूस केली. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित विश्वस्त परिषदेदरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे ही भेट झाली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे उपस्थित होते.
बापट शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. दरम्यान, या वेळी बोलताना पवार यांनी पुण्यात अनेक वेळा आम्ही अनेक जागा जिंकल्या; पण मला अजून लक्षात आलं नाही की गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन निवडून कसे येतात, असं शरद पवार चार महिन्यांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात (अंकुश काकडे लिखित 'हॅशटॅग पुणे' पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात) म्हणाले होते. एकदा गिरीश बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही, अशी आठवणही पवारांनी सांगितली.
धर्मादाय आयुक्तालयासाठी जागेची अडचण : बापट
धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभाग कार्यालयाची जागा ही मोठी अडचण आहे. याशिवाय 105 पदांची मान्यता असून, केवळ 60 जणांवर काम सुरू आहे. पुण्यामध्ये 75 हजार संस्था असून, त्यांच्या अडचणी व प्रश्न या कार्यालयाद्वारे सोडविल्या जातात. मात्र, येथे साधे झेरॉक्स मशिन ठेवायला देखील जागा नाही, असे अनेक प्रश्न आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालायला हवे, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.