पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे शुक्रवार (दि.16) ते मंगळवार (दि.20) असे पाच दिवस पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे उद्घाटन शुक्रवार (दि. 16) झाले. जत्रेत वेगवेगळ्या वस्तू, साहित्य, कपडे, महिला प्रसाधन साहित्य तसेच, खाद्यपदार्थाचे 450 स्टॉल आहेत.जत्रेचे उद्घाटन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर उषा ढोरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी नगरसेवक व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले की, पालिकेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचे आर्थिक, मानसिक व सामाजिक सक्षमीकरण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपायुक्त इंदलकर यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. सुहास बहाद्दरपुरे यांनी आभार मानले. जत्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.