बलभीम भोसले
दापोडी (पिंपरी): दुर्गंधीयुक्त काळवंडलेले पाणी…, सडलेला प्लास्टिक कचरा…., गटारातील सांडपाणी…, वाढत असलेली जलपर्णी…, आदीमुळे पवना नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पिंपळे गुरव पवना नदीच्या पात्रात सांडपाणी व गटारामधील मैलामिश्रित पाणी नदीत सोडल्यामुळे पवनानदी गटारगंगा बनली आहे. त्यामुळे नदीमधून पाण्याची दुर्गंधी येत आहे.
नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन व महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. प्रशासन व अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे रावेतपासून आकुर्डी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडीपर्यंत नदीपात्रात प्लास्टिक पिशव्या, फाटकी कपडे, जलपर्णी आदींचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पुरते काळवंडून गेले आहे. काळवंडलेल्या पाण्यात पिवळ्या रंगाचे मैलामिश्रित पाणी मिसळत आहे.
शेतकर्यांना वरदान ठरणारे पवनानदी मावळमध्ये सुस्थितीत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र निर्मळ प्रवाहाच्या नदीला प्रदूषणाचे गालबोट लागत आहे. यासाठी शासनच नव्हे, तर नदीकाठच्या नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन नदीच्या संवर्धनाची गरज भासू लागली आहे. पिंपळे गुरवमध्ये पीएमपीच्या बसस्थानकाजवळ तुळजाभवानी मंदिराजवळ मैलामिश्रित वाहिनीचा चेंबर तुटल्यामुळे पाणी थेट पवनानदी पात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नदीपात्रात कचरा टाकणार्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नदीतील पाण्याची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा कचरा व राडारोडा नदीपात्रात जाणार नाही. नदीपात्र स्वच्छ राहील, यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रावेत ते दापोडीपर्यंत पवना नदीपात्रात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासनाकडून स्वच्छतेसंदर्भात फक्त आश्वासने दिली जातात. प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही. यासंदर्भात महापालिकेवर अनेक खटले व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
– राजू सावळे, पर्यावरणप्रेमी, सांगवी.मैलामिश्रित पाणी वाहत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली जाईल. पाहणी केल्यानंतर त्वरित काम मार्गी लावले जाईल. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
– संजय कुलकर्णी, पर्यावरण, ड प्रभाग.