पुणे

कोविडनंतर रुग्णांना सांधेदुखी, नागीणचा त्रास- त्वचारोगतज्ज्ञ

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोविडमधून बरे झाल्यावर रुग्णांना सांधेदुखीच्या समस्या, हृदयाच्या समस्या, रक्ताचा गुठळ्या होणे आणि श्वसनाच्या समस्या यांसह अनेकांना सांधेदुखी आणि नागीण यांचा त्रास होत आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेदरम्यान नागीण आणि सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानंतरही डॉक्टर रुग्णांना निरोगी जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन करीत आहेत. ज्यांना सांधेदुखीचा पूर्वीचा इतिहास आहे त्यांनाही याचा आणखीनच त्रास होताना दिसून येत आहे.

काही जणांनी ऑटोइम्यून आर्थायटीजची तक्रार देखील केलेली दिसून येते. हे रुग्ण सांधेदुखी किंवा स्नायूदुखी किंवा मायल्जिया, अत्यंत थकवा, संधिवात आणि रक्तवाहिन्यासंबंधीचा दाह (रक्तवाहिन्यांची जळजळ) ची तक्रार करीत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. हे टाळण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे. निरोगी जीवनशैली अवलंबली पाहिजे. सांधे आणि स्नायूदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी निरोगी आहाराचे पालन केले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. सांधेदुखीबरोबरच कोरोनापश्चात बर्‍याच लोकांना नागीण होत असल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत.

महिलांमध्ये समस्या जास्त

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या समस्या सामान्यतः दिसून येतात. त्वचेवर पुरळ येणे, लालसरपणा येणे, डोळ्यांभोवती तसेच नाक, ओठ यांसारख्या भागात त्वचारोग दिसून येणे, यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. हे संक्रमण ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांमध्ये आढळून येते. ज्या रुग्णांना पूर्वेतिहास आहे अशा रुग्णांमध्ये नागीण आणि त्वचेची इतर गुंतागुंत निर्माण होत आहे. पुरळ उठणे, त्वचेचा लालसरपणा आणि ठिपके उठणे, यांसारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी तत्काळ वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञ देतात.

कोविडनंतर तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही रुग्णांना नागीण होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये प्रतिकारशक्तीमध्ये बदल झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरातील सुप्तावस्थेत असलेले नागीणचे विषाणू पुन्हा सक्रिय होतात. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागीणची लस घेणे हा पर्याय उपलब्ध आहे.

                      – डॉ. वसुधा बेळगावकर, सहयोगी प्राध्यापक, त्वचारोग विभाग, ससून

कोविडमुक्त झाल्यानंतर बहुतांश रुग्ण सांधेदुखीने त्रस्त आहेत. कोणत्याही विषाणूच्या संसर्गामुळे सांधेदुखीमध्ये वाढ होते तशी ती यामध्येदेखील दिसून येत आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्टिरॉइड आणि अँटीव्हायरल औषधांचा परिणाम म्हणून ही संधिवात समस्या उद्भवली आहे. यामध्ये विशेष करून खुब्यातील हाड दुखण्याचे प्रमाण वाढलेले आहे. रक्त साकळण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे हे दुखणे वाढलेले दिसून येत आहे. यामध्ये खुब्याचे हाड हे रक्तपुरवठा कमी झाल्याने दुखते. त्यासाठी डॉक्टरांना दाखवावे.

डॉ. नीलेश जगताप, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन,

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT