पुणे: राज्य आरोग्य अहवालानुसार राज्यात अंदाजे 12 हजार थॅलेसेमिया रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात 1000 ते 1200 थॅलेसेमिया रुग्ण आहेत. जनकल्याण समितीतर्फे करण्यात आलेल्या 24 हजार लोकांच्या रक्ततपासणीत 3 टक्के लोक थॅलेसेमिया वाहक म्हणून आढळले आहेत. दरवर्षी देशात 10 ते 15 हजार मुलांचा जन्म थॅलेसेमिया मेजरसह होतो.
दरवर्षी 8 मे हा दिवस जगभरात जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळला जातो. थॅलेसेमियाचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्याची छुपी लक्षणे. अनेकदा सुरुवातीच्या काळात या आजाराची कल्पनाही नसते.
अशक्तपणा, सतत थकवा, वजन न वाढणे, त्वचा पिवळसर दिसणे, अभ्यासात लक्ष न लागणे, भूक मंदावणे किंवा वारंवार आजारी पडणे, यांसारखी लक्षणे सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. आजही अनेक रुग्णांच्या योग्य वेळी तपासण्या होत नाहीत.
काहीवेळा वैद्यकीय सुविधांचा अभाव, आर्थिक अडचणी, सामाजिक अज्ञान किंवा रक्तविकारांविषयी असलेले गैरसमज, यामुळे निदान अपूर्ण राहते. विशेषतः ग््राामीण आणि आदिवासी भागांमध्ये जागरूकतेचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे थॅलेसेमिया रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होतात, अशी माहिती भारतीय रक्तविज्ञानशास्त्र संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. शंकर मुगावे यांनी दिली.
आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आज थॅलेसेमियावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. उपचारांचा लाभ वेळेवर निदान झाल्यास प्रभावीपणे मिळू शकतो. प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी विवाहपूर्व रक्ततपासणी, गर्भधारणेपूर्व समुपदेशन आणि कुटुंबातील इतिहास तपासणे, या उपाययोजना आवश्यक आहेत.- डॉ. शंकर मुगावे, राष्ट्रीय समन्वयक,
भारतीय रक्तविज्ञान शास्त्र संस्था थॅलेसेमिया मेजर असलेल्या मुलांना आयुष्यभर उपचारांची आणि नियमित वैद्यकीय देखरेखीची गरज असते. प्रमुख उपचारांमध्ये नियमित रक्तसंक्रमण करून हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखणे, प्रभावी आयर्न चेलेशन थेरपी, लसीकरण आणि संसर्ग प्रतिबंधक उपाय, योग्य आहार आणि नियमित फॉलोअप यांचा समावेश आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट हा सध्या थॅलेसेमिया मेजरसाठी एकमेव कायमस्वरूपी उपचार मानला जातो. जनुकीय उपचार क्षेत्रातही मोठी प्रगती होत आहे.- डॉ. लिझा बुलसारा, कन्सल्टंट पेडियाट्रिक हेमॅटोलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक