पुणे

प्रवाशांनो, मणके सांभाळा! बारामती-निरा रस्त्यावर गतिरोधकांमुळे प्रवासी हैराण

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : निरा-बारामती या राज्यमार्गावर सर्वाधिक असलेल्या धोकादायक गतिरोधकांमुळे प्रवासी हैराण
झाले असून, 'प्रवाशांनो, मणके सांभाळा' असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोणत्याही नियमांचे पालन न करता टाकलेले गतिरोधक वाहनांच्या नुकसानीसह वाहनचालकांच्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वारंवार गतिरोधक नियमाप्रमाणे करण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याने एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल दीड तास वेळ खर्ची पडत आहे. गतिरोधक टाकण्याला प्रवाशांचा विरोध नाही. मात्र, गरज नसताना टाकलेले गतिरोधक हटविण्याची गरज आहे. सर्वाधिक रहदारीचा रस्ता असल्याने रस्तादुरुस्तीसह चारपदरी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करून धोकादायक प्रवास करावा लागतो. एसटीच्या सर्वाधिक फेर्‍या या मार्गावर सुरू आहेत. याशिवाय सध्या सुरू असलेल्या सोमेश्वर व माळेगाव कारखान्याची ऊस घेऊन जाणारी वाहने याच रस्त्यावरून प्रवास करीत असल्याने रस्त्यावर धोकादायक वाहतूक सुरू आहे. पणदरे व खामगळवाडी हद्दीतील पुलांची कामेही सुरू आहेत.

त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण जास्त आहे. माळेगाव येथे नव्यानेच रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे गतिरोधक टाकले आहेत. बारामती येथील कसबा, म्हसोबा मंदिर, शारदानगर, माळेगाव, पणदरे, कोर्‍हाळे, वडगाव, दहाफाटा, सोमेश्वरनगर तसेच निंबुत भागात गतिरोधक टाकण्याची स्पर्धाच निर्माण झालेली दिसून येत आहे.

रस्ता चारपदरी करण्याची नितांत आवश्यकता
बहुतांश गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत, काही गतिरोधक नियमापेक्षा जास्त उंच आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा गतिरोधक दिसत नसल्याने अपघात होत आहेत. गतिरोधकांवर रेडियम लावून ते नियमाप्रमाणे बनविणे गरजेचे आहे. ठेकेदार रस्त्यांची कामे झाल्यानंतर त्यांची डागडुजी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता चारपदरी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, याला यश आले नसल्याने रस्त्यावरील ताण लक्षात घेता यापुढे हा रस्ता चारपदरी करण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT