Pashan Lake Pollution Issue Pudhari
पुणे

Pashan Lake Pollution Issue: महापालिका प्रशासनाचा अजब कारभार; पाषाण तलावातील जलपर्णी थेट राम नदीत!

दूषित पाणी रोखण्यासाठी अद्याप उपाययोजना नाहीत

पुढारी वृत्तसेवा

मोहसीन शेख

बाणेर: पाषाण तलावातील जलप्रदूषणामुळे गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला जाग आली आणि जलपर्णी काढण्याचे वेगाने सुरू करण्यात आले. तलावातून काढण्यात येत असलेले जलपर्णी नदीपात्रातून लांब फेकणे आवश्यक आहे. परंतु ती पुढे राम नदीपात्रात ढकलली जात आहे.

प्रशासनाच्या या अजब कारभाराबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. पाषाण तलावातील जलपर्णी आणि दूषित पाण्यामुळे गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले होते.

याबाबत दै.‌‘पुढारी‌’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिका प्रशानाला जाग आली आणि जलपर्णी काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. परंतु वरील भागातून तलावात येणारे दूषित पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने अद्याप काहीच उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे.

या ठिकाणी असलेला एसटीपी प्लांट दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी अपुरा पडत आहे, मग या प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाच कशासाठी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सुतारवाडी भागातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहे. तलावातून काढण्यात येणारी जलपर्णी नदीपात्रातून लांब टाकणे आवश्यक आहे.

मात्र, तळेश्वर मंदिराजवळील तलावाच्या भिंतीवरून ही जलपर्णी खाली राम नदीपात्रात ढकलली जात आहे. नदीपात्रात ही जलपर्णी पसरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तसेच यामुळे नदीपात्रात देखील जलपर्णी फोफावण्याची शक्यता आहे. पाऊस झाल्यानंतर ही जलपर्णी नदीपात्राच्या प्रवाहात अडथळा ठरणार आहे. सध्या या तलावाच्या भिंतीजवळ जलपर्णीचा मोठा ढीग लावल्याचे चित्र दिसून येत आहे.

नदीपात्रातील जलपर्णीची काढण्याची मागणी

पाषाण तलावातून राम नदीमध्ये ढकलण्यात येणारी जलपर्णी त्वरित काढून तिची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहे. तलावातून ढकलण्यात येत असलेल्या जलपर्णी लवकर काढली नाही तर नदीपात्रातही ती फोफावण्याची शक्यता आहे. पुढे राम नदी मुळा नदीला मिळत असल्याने पावसाळ्यात या जलपर्णीचा प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही.

पाषाण तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात काढण्यात आली असून, आता फक्त 20 टक्के काम बाकी आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत सर्व जलपर्णी काढण्यात येईल. तलावातून काढण्यात येणारी जलपर्णी राम नदीपात्रात ढकलली जात आहे, याबाबत काही माहिती नाही. परंतु लवकरच पाहणी करून नदीपात्रात जलपर्णी ढकलली जात असल्यास ती उचलली जाईल.
- विवेकानंद बडे, कनिष्ठ अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT