Pasali Torna rice disease crop loss
वेल्हे: जिल्ह्यात भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगड तालुक्यातील पासली अठरागाव मावळ खोऱ्यासह तोरणा, राजगड भागात हातातोंडाशी आलेल्या उभ्या भात पिकावर करपा रोगासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, भात पिकावरील रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केळदचे (ता. राजगड) सरपंच रमेश शिंदे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (Latest Pune News)
भात पिकावरील रोगाची सर्वांत गंभीर स्थिती रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील आठरागाव मावळ भागातील भोर्डी, वरोती, शेनवड, बालवड, पासली, केळद, हारपूड आदी गावांत व वाड्या-वस्त्यांत निर्माण झाली आहे.
दि. 15 मेपासून सुरू असलेला सततचा पाऊस, दाट धुके आणि ढगाळ वातावरणामुळे भात रोपांची वाढ खुंटली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून करपासारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. उभी पिके पिवळी पडून मुळापर्यंत पांढरी पडली आहेत.
याबाबत रमेश शिंदे यांनी सांगितले की, अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लागवड केलेल्या जवळपास सर्वच भात पिकांचे पाऊस व रोगाने नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी केवळ भातशेतीवरच अवलंबून आहे. पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सोमवारी (दि. 8) राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांची भेट घेऊन रमेश शिंदे व शेतकऱ्यांनी भात पिकाच्या नुकसानीच्या व्यथा मांडल्या.
भात पिकाच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित कृषी विभाग व महसूल अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.- निवास ढाणे, तहसीलदार, राजगड