खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खडकवासला बाह्यवळण रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामाने शुक्रवारी खडकवासला येथे महाविद्यालयीन युवकाचा बळी घेतला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. पुलाजवळ दुपारी तीनच्या सुमारास एका इमारतीच्या संरक्षक भिंतीला दुचाकी धडकून हा अपघात झाला.
अनिकेत भीमसेन वाईकर (वय 22, रा. अहमदनगर), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र विशाल पालकर (वय 21, रा.लोणावळा) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे हवेली पोलिस ठाण्याचे अंमलदार संतोष भापकर यांनी सांगितले.
अनिकेत व विशाल खडकवासला धरणाकडून दुचाकीवरून पुण्याकडे जात होते. त्या वेळी बाह्यवळण रस्त्यावरील पुलाच्या खड्ड्यात दुचाकी घसरून ती थेट जवळील इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आदळली. यात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, गणेश धनवे, गुलाबराव आंबेकर यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत खडकवासलापासून धरण चौपाटी, डीआयडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रस्त्याला साईडपट्ट्याच नाहीत
या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे गेल्या दोन वर्षांत पुणे-पानशेत रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत पंचवीसहून अधिक जणांचे अपघातांत मृत्यू झाले आहेत. खडकवासला बाह्यवळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या नसल्याने, तसेच रस्त्यावर वाहनांचे पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.