बारामती : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बारामती रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षित करण्यासाठी आलेल्या सहा परप्रांतीय मजुरांना मोटारसायकलवरून आलेल्या सात जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिकने जबर मारहाण करत मोबाईल व पैसे हिसकावून घेतले. ही घटना बुधवारी (दि. 11) पहाटे घडली. याबाबत परप्रांतीय मजुरांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रवी कुमार, विनीत कुमार, मनीष विश्वकर्मा, सोनू प्रजापती, भीम प्रजापती आणि जितेंद्र चौहान (रा. आझमगढ नुरुद्दीनपूर, उत्तर प्रदेश) हे कामगार आपल्या गावी उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते.
आरक्षणाची खिडकी सकाळी उघडणार असल्याने आणि अन्य ठिकाणी मुक्कामाची सोय नसल्याने ते रेल्वे स्थानकावर झोपले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात टोळक्याने रेल्वे स्थानकाची पाहणी करून या मजुरांना दमदाटी करत पैसे व मोबाईल मागितला. त्यांनी नकार देताच त्या टोळक्याने त्यांना हॉकी स्टिकने मारण्यास सुरुवात करत त्यांना जखमी केले. त्यांच्याकडे असणारे पैसे व चार मोबाइल संच घेऊन पसार झाले. हे तरुण भेदरलेल्या अवस्थेत शहरातील भिगवण चौकाकडे जात असताना या टोळक्याने पुन्हा त्यांना अडवत मारहाण केल्याचे जखमी कामगारांनी सांगितले. जखमीवर सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यावर उत्तर प्रदेशातील; परंतु बारामतीत कामानिमित्त आलेले मजूर मोठ्या संख्येने जमा झाले. याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. बारामतीत मागील काही दिवसांत झालेल्या अशा हल्ल्यात काही जणांना आपला जीव गमवावा लागला असून, शहरात होणार्या अशा प्रकारांबाबत पोलिसांनी कडक कारवाई करत या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर जरब बसण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
सीसीटीव्ही यंत्रणाच नाही
बारामती शहर देशातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. मात्र, शहरातील रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशी दुर्दैवी स्थिती आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शहरातील विष्णुपंत चव्हाण यांनी मदत केली; परंतु परवानगी नसल्याने ते बसविलेच गेले नाहीत.
तक्रार दाखल करण्यासाठी जावे लागते दौंडला
बारामती रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे सहा अधिकारी व कर्मचारी कागदोपत्री नेमणुकीला आहेत; परंतु बर्याचदा येथे एकही कर्मचारी नसतो. अनेकदा लोणी स्टेशनचीच ड्युटी दिली जाते, त्यामुळे येथे थांबता येत नसल्याचे कर्मचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. रेल्वे पोलिसांचे येथे कार्यालय नाही, त्यामुळे घटना घडली तर ती दाखल करण्यासाठी दौंडला जावे लागते.