पुणे

बावधन : सत्तराव्या वर्षी 1600 फूट उंचीवरून पॅराजम्पिंग

अमृता चौगुले

बावधन; पुढारी वृत्तसेवा : वय वर्ष 70… तरीही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 1600 फूट उंचीवरून विमानातून पॅराजम्पिंग केले..! भुकूम येथे निवृत्त कर्नल डॉ. गिरिजा शंकर मुंगली यांनी हे धाडस केले असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

भारतीय सैन्य दलातून कर्नलपदावरून निवृत्त झालेले डॉ. मुंगली हे सैन्य दलातील अ‍ॅडव्हेंचर विभागाचे प्रमुख होते. त्यांनी सैन्य दलातील अनेक महत्त्वाच्या मोहिमा फत्ते केल्या आहेत. भारत-बांगलादेश यांच्यातील संयुक्त राफ्टिंग मोहिमेतही त्यांचा समावेश होता. तसेच अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या त्यांनी कुशलतेने पार पाडल्या आहेत. हिमालय पर्वतावर त्यांनी अभ्यास करून पीएचडी केली आहे.

सैन्य दलामध्ये असताना ते अ‍ॅडव्हेंचर विभागाचे प्रमुख असल्यामुळे त्यांनी हिमालयातील अनेक उंच शिखरे आणि त्यांच्या वरील मोहिमा यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. सध्या ते एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशनचे टास्क फोर्सचे सदस्य आहेत. हवाई दलाच्या 'पॅरा रियुनियन : 2022' या 50 व्या पॅराशूट ब्रिगेड महोत्सवामध्ये त्यांनी आग्रा येथील हवाई दलाच्या ट्रेनिंग सेंटरमधील एअर बेसवर त्यांनी 1600 फूट उंचीवरून विमानातून पॅराजम्पिंग केले. यामध्ये त्यांच्याबरोबर आणखी 35 जणांचा समावेश होता. परंतु, या टीममध्ये ते सर्वांत ज्येष्ठ होते.

पॅराशूटला होल पडले तरीही…
पॅराशूट उघडल्यानंतर त्याला अचानक एक होल पडले. मात्र, डॉ. मुंगली यांनी त्यांचा पूर्वीचा अनुभव त्या ठिकाणी उपयोगाला आणत अतिशय सुखरूप आणि अलगदपणे हे पॅराशूट खाली उतरवत जमिनावर टेकवले. विमानातून उडी मारल्यानंतर सेकंदाला 28 फूट या वेगाने ते खाली येत होते. हा अनुभव त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितला. हे साहस पाहण्यासाठी त्यांचा मुलगा अनुज आणि नातू शौर्य आवर्जून उपस्थित होते

भुकूममध्ये राहून मला खूप ऊर्जा मिळते. तसेच, मी भुकूमकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी मी धाडसी पॅराजम्पिंग केले. विमानातून उडी मारल्यानंतर जमिनीवर सुखरूप पाय टेकण्यापर्यंत मोठा धोका असतो. जोपर्यंत तुमचे पॅराशूट यशस्वीपणे पूर्ण उघडत नाही तोपर्यंत सर्वकाही रामभरोसे असते.

                                                       – डॉ. गिरिजा शंकर मुंगली,
                                                                    निवृत्त कर्नल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT