मंचर : मंचर येथील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष व पराग मिल्क फुड्स लिमिटेडचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या मातोश्री रजनीबेन प्रकाश शहा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने मुंबई येथील निवासस्थानी शनिवारी साडेचार वाजता निधन झाले. अंत्यविधी मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीत उद्या रविवारी (दि. २७) बारा वाजून दहा मिनिटांनी होणार आहे.
रजनीबेन शहा यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून, शरद बँकेचे अध्यक्ष, पराग मिल्क फुड्स लिमिटेडचे चेअरमन देवेंद्र शहा, पराग मिल्क फुड्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक प्रीतमभाई शहा यांच्या त्या आई होत. रजनीबेन शहा ह्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजसेविका म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी स्थापन केलेल्या रजनी प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिर, धार्मिक कार्यक्रमात त्या सहभागी असत. मंचर परिसराच्या विविध सामाजिक कार्यात तसेच समाजाच्या विकासासाठी व विविध कामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असे. त्यांच्या निधनामुळे मंचर शहर आणि परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे.