खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वेल्हे तालुक्यातील पानशेत, वरसगाव, गुंजवणी तसेच वेल्हे व हवेली तालुक्यांत पाणलोट क्षेत्र असलेल्या खडकवासला धरणक्षेत्राला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. पाणलोट क्षेत्रासह धरणाच्या भिंतीजवळील मुख्य सांडव्यालगतच अतिक्रमणे सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रातच अतिक्रमणे उभी राहिली असल्याने धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याकडे जलसंपदा विभागासह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र पुढे आले आहे. सर्वांत गंभीर चित्र पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणक्षेत्रात आहे. तोरणागडाच्या पायथ्याला असलेल्या धानेप येथील गुंजवणी धरणक्षेत्रातही अतिक्रमणे सुरू झाली आहेत.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन बदाणे म्हणाले की, पानशेत, वरसगावसह खडकवासला धरणक्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमणांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. धरणाच्या सुरक्षेला बाधा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. भूमिअभिलेख खात्याच्या वतीने जलसंपदा विभागाच्या जमिनीची मोजणी करण्यात येत आहे.
गुंजवणी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल म्हणाले की, गुंजवणी धरणक्षेत्रात बेकायदेशीर अतिक्रमण करणार्यांना तातडीने नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. धरणक्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या जागेत अतिक्रमण होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.
धरणक्षेत्रातील सरकारी जमिनीत बेकायदेशीर खोदकाम केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारची चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
-दिनेश पारगे,तहसीलदार,
वेल्हे तालुका