खडकवासला : दररोज हजारो पर्यटकांची वर्दळ असलेल्या पानशेत परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. पानशेत धरणाच्या वांजळवाडी सांडव्याजवळील मुख्य पानशेत-वेल्हे रस्त्यावरील कुरण खुर्द (ता. राजगड) येथे बिबट्याने डी. एस. ठाकर यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला आहे. या घटनेमुळे वन विभागाने पर्यटकांसह शेतकर्यांना खबरदारीचे आवाहन केले आहे. (Pune latest News)
ठाकर यांचे घर पानशेत-वेल्हे रस्त्याच्या आडबाजूला आहे. रात्रीच्या सुमारास एक धष्टपुष्ट बिबट्या घराच्या आवारात शिरला. तेथे असलेल्या कुत्र्याचा फडशा पाडून बिबट्या कुत्र्याला घेऊन जंगलात पसार झाला. ठाकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजमध्ये हा प्रकार चित्रित झाला आहे.
पानशेत विभागाचे वनरक्षक राजेंद्र निंबोरे यांनी बुधवारी (दि. 23) पथकासह घटनास्थळ तसेच गाव व परिसरात गस्त घातली. पानशेत वन विभागाच्या वन परिमंडल अधिकारी स्मिता अर्जुने म्हणाल्या, सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे आम्ही बिबट्याचा शोध घेतला. मात्र, गाव तसेच आसपासच्या वाड्या-वस्त्यांत बिबट्याचे ठसे सापडले नाहीत. सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच, जनजागृती सुरू केली आहे.
पानशेत कुरण खुर्द, कादवेसह धरण परिसरात सततच्या पावसामुळे दलदलीसह गवत, झुडपे वाढली आहेत. या भागात घनदाट जंगल आहे. बिबट्यासह वन्यजीवांचा अधिवास वनक्षेत्रात आहे. त्यामुळे सायंकाळी सहापासून सकाळी सहा वाजेपर्यंत वनक्षेत्रात बेकायदा प्रवेश करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.