खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह दुर्गम डोंगररांगांत विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र पसरलेल्या पानशेत (तानाजी सागर) धरणफुटीस रविवारी (दि. १२) ६५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पानशेत धरणमाथ्यावर आयोजित कार्यक्रमात धरणफुटीच्या वयोवृद्ध साक्षीदारांना कटू आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर झाले.
स्थानिक मावळा जवान संघटनेच्या वतीने पानशेत धरणफुटीनिमित्त धरणमाथ्यावर वयोवृद्ध साक्षीदारांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्मीळ प्रतिमा, शिवचरित्र, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
गुलाब गणपत निवंगुणे (वय ८४, रा. वरसगाव), नागू लक्ष्मण डोईफोडे (वय ८१, रा. आंबेगाव बुद्रुक), चिंतामण पोळेकर (वय ७९, रा. माणगाव), सरूबाई गायकवाड (वय ७८, रा. कुरवटी) व चिंतामण कमळू मरगळे (वय ७७, रा. गोंडेखल चांदसड) या वयोवृद्धांनी धरणफुटीमुळे आलेल्या महाप्रलयाच्या आठवणी सांगितल्या.
या वेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, पानशेत कुरण खुर्दचे माजी उपसरपंच बाळासाहेब देशपांडे, बाळासाहेब कोंडेकर, दादासाहेब माने, सुनील देशपांडे, भास्कर सोनवणे, सिद्धेश नागपुरे, ऋषिकेश साळेकर, मिरान शेख आदी उपस्थित होते.