गोसेवा आयोगाला शासनाचा खंबीर पाठिंबा: पशुसंवर्धनमंत्री मुंडे Pudhari
पुणे

गोसेवा आयोगाला शासनाचा खंबीर पाठिंबा: पशुसंवर्धनमंत्री मुंडे

गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवक्ता कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे गोसंवर्धन व गोसंरक्षणाचे कार्य उत्तम आहे. आयोगामार्फत राबवल्या जाणार्‍या उपक्रमांसाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय अधिवक्ता कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल अध्यक्ष पारिजात पांडे, आयोगाचे सदस्य सनात गुप्ता, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, संजय भोसले, सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, “देशामध्ये गायींच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सर्वात जास्त निधी महाराष्ट्रात खर्च केला जातो. गोसेवेतून गायी वाचविण्याबरोबरच गोवंशसुध्दा वाचविला पाहिजे. गाय आपल्या देशात केवळ एक पाळीव प्राणी नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, धार्मिकतेचा आणि जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

गायीचा सांभाळ करणार्‍या शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गोसेवा आयोगाचे अध्यक्षा शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्रात 1 हजार 67 गोशाळा आहेत. बर्‍याच गोशाळा नोंदणीकृत असून, काही गोशाळांनी अजून नोंदणी केलेली नाही. गोशाळांनी नोंदणी करणे अनिवार्य असून, गोवंश गोशाळेत न जाता तो शेतकर्‍यांनी सांभाळला पाहिजे, गोशाळा स्वावलंबी झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही काम करत आहोत.

‘महापशुधन संजीवनी तत्काळ प्रतिसाद’ केंद्राचे उद्घाटन

कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 1962 महापशुधन संजीवनी तत्काळ प्रतिसाद केंद्राचे उद्घाटन पशुसंवर्धनमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सुपर स्पेशालिटी व्हेटर्नरी हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची पाहणी करून प्रयोगशाळेस भेट दिली. या कार्यशाळेत राज्यातील गोवंश हत्याबंदी कायद्याचे केसेस लढविणारे सुमारे 100 अनुभवी वकील, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित हाते.

मस्साजोग प्रकरणावर मी बोलणे योग्य नाही!

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता गृहखात्याकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात आरोपींना शिक्षा केली जाईल, असा शब्द दिला आहे, त्यामुळे आता या प्रकरणावर मी काहीच बोलणे योग्य नाही, मी त्या हत्येचा निषेधच केला आहे, असे कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT