खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: धायरी येथील वस्ताद हरिभाऊ पोकळे मनपा शाळेत आग्या मोहोळाने ठाण मांडले आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दररोज मोहळाच्या दहशतीत विद्यार्थ्यांना कसेबसे शिक्षण घ्यावे लागत आहे. भीतीमुळे अनेक विद्यार्थी शाळेतही येत नाहीत.
शिक्षकांनी याबाबत तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी याबाबत गेल्या 20 सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देऊन या मोहोळाची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे. तरीही अद्याप मोहोळ आहे त्या ठिकाणी ठाण मांडून आहे. सततच्या पावसामुळे मोहोळाचा आकार वाढत चालला आहे.
राजगड, सिंहगड आदी किल्ल्यांवर, तसेच इतर ठिकाणी मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेकांचे बळी गेले आहेत. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशा दुर्घटना ताज्या असतानाही धायरी येथील आग्या मोहोळाकडे शिक्षण विभागास प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे. गेल्या चार महिन्यांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे मधमाश्यांना जवळपासच्या सोसायट्या, परिसरात फुलांवर खाद्य मिळत आहे. मोहळाच्या मधमाश्या थेट वर्गात, तसेच स्वच्छतागृहांत शिरत आहेत.
मधमाश्यांपासून विद्यार्थ्यांचे कसे रक्षण करावे, या समस्येने शिक्षक हतबल झाले आहेत. जवळपास दीड हजारांवर विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व वर्ग फुल आहेत. शाळेच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील प्रयोगशाळेच्या खिडकीवर मोहोळ बसले. या मोहळाची रुंदी जवळपास सव्वा फुट व उंची दीड फूट आहे.
यामुळे प्रयोगशाळेचा दरवाजा, खिडक्या उघडता येत नाहीत. याबाबत प्रशासनाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. लायगुडे म्हणाले, 'मोहोळामुळे मुलांच्या जिवाला धोका आहे. अग्निशमन दल अथवा आपत्कालीन यंत्रणेच्या वतीने मोहोळ काढण्यात यावे.'
अगोदर एकदा मोहोळ उठून गेले होते. मात्र, दीड वर्षांपूर्वीं पुन्हा त्याच जागी मोहोळ बसले. सुरुवातीला आकार लहान असल्याने त्याची भीती नव्हती. आता मात्र मधमाश्या दंश करण्याची शक्यता आहे.
-दत्तात्रय सैद, शिक्षक