pandit sanjiv abhyankar pudhari
पुणे

Pune News: स्वरसंजीवन भक्तिसंध्येत रसिक चिंब

पं. संजीव अभ्यंकर यांच्या गायकीने रसिकांना दिली भक्तिरसाची अनुभूती

पुढारी वृत्तसेवा

पुणे : श्रीविठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमलेले सभागृह ... पं. संजीव अभ्यंकर यांच्या मधुर गायकीने उपस्थितांना दिलेली भक्तिरसाची अनुभूती... त्यांच्या गायकीला रसिकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद अन् आषाढी वारीनिमित्त भक्तिरंगात न्हाऊन गेलेले रसिक... असा आषाढी वारीचा भक्तीचा सोहळाच जणू स्वरसंजीवन भक्तिसंध्येतून रसिकांना गुरुवारी (दि.3) अनुभवता आला. ‘दैनिक पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’च्या वतीने प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या सुरेल गायकीने सजलेला हा अद्वितीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अन् पं. अभ्यंकर यांनी सादर केलेल्या भक्तिरचनांनी रसिकांना स्वरानंद दिला. रसिकांनीही भक्तीचा हा सोहळा अनुभवत ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम तुकाराम’चा जयघोष केला.

आषाढी वारीनिमित्त वारकर्‍यांची पाऊले पंढरीकडे निघाली आहेत... वारीतील भक्तीची अनुभूती पुण्यातही रसिकांना स्वरसंजीवन भक्तिसंध्येने अनुभवायला मिळाली. पंडित अभ्यंकर यांच्या गायकीने रसिकांची मने जिंकली.

पं. संजीव अभ्यंकर, कार्यक्रमाचे फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मार्केटिंग हेड आदित्य भेंडे, दै. ‘पुढारी’ पुणेचे सरव्यवस्थापक सुनील लोंढे, दै. ‘पुढारी’ च्या पुणे युनिटचे मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, एचआर हेड आनंद कुलकर्णी, दै. ‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी यांनी दीपप्रज्वलन केले. या वेळी श्रीविठ्ठल- रखुमाईचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप, फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि सहप्रायोजक बढेकर डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष झाला अन् खर्‍या अर्थाने या भक्तिसोहळ्याचा हा प्रवास सुरू झाला.

भक्तीचा- नामस्मरणाचा गजर, टाळ्यांचा कडकडाट अन् भक्तिरंगात रमून गेलेले रसिक... असे वातावरण कार्यक्रमात रंगले होते.

पं. अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), प्रथमेश तरळकर (पखवाज), आदित्य आपटे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. तर विलीना पात्रा, साईप्रसाद पांचाळ, मुक्ता जोशी आणि रुद्रप्रताप दुबे यांनी स्वरसाथ केली. मंजिरी जोशी यांनी निरुपण केले. सुनील माळी यांनी प्रास्ताविक केले. योगिता गवस यांनी सूत्रसंचालन केले. संतोष धुमाळ यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT