पुणे

पिंपरी : उत्तम काम करणार्‍या पंचायतींचा गौरव करणार : केंद्रीय मंत्री कपिल पाटील

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरांबरोबर गावचा विकास होणे गरजेचे आहे. गावाला सुरक्षित समृद्ध करण्याची जबाबदारी सरपंचांवर आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने उत्तम काम करणार्‍या पंचायतींचा दरवर्षी 17 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या पंचायतींच्या सरपंचांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत चहा पार्टीचा आनंद घेता येईल, असे विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे केले.

चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात स्वच्छ आणि हरित ग्राम जलसमृद्ध गाव या विषयावर आयोजित कार्यशाळेत अध्यक्ष स्थानावरून केंद्रीय मंत्री कपिल पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण व क्रीडामंत्री गिरीश महाजन, भारत सरकारच्या पंचायती राज्याचे सचिव सुनील कुमार; तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अवर मुख्य सचिव राजेश कुमार; पंचायतराज मंत्रालयाचे अवर सचिव चंद्रशेखर कुमार, हिवरे बाजारचे प्रवर्तक पोपटराव पवार आदी
उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की, ग्राम पंचायतींनी स्थायी विकासाचे उद्दिष्ट पार केले पाहिजे. या परिषदेस 28 राज्यातून 253 लोक तर महाराष्ट्रातून 800 लोक आले आहेत. सरपंचांकडे गावची चावी असते. त्यामुळे गावाला सुरक्षित ठेवून समृद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'घर घर जल हर घर नल' हा संकल्प केला आहे. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. काम उभे करण्यासाठी पैसा हवाच असे काहीही नाही बिना पैशात काम उभे केले तर लोक नाव काढतात, असेही ते म्हणाले.

राज्याचे ग्रामविकास पंचायतराज मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, चांगले काम केल्यास लोक पुन्हा पुन्हा निवडून देतात.पंचायतराजमुळे सरपंचांनाच अधिक अधिकार मिळाले आहेत. त्याचा उपयोग करून देश विकासाबरोबर गाव सुंदर बनविण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा. अनेक गावांमध्ये वाहतूक शाळा आदी सुविधा अपुर्‍या आहेत. आदिवासी महिलांना आजही विहिरीत 25 फूट खाली जाऊन पाणी आणावे लागते. हे चित्र बदलले पाहिजे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा उपयोग गोडाऊनसाठी केला जात आहे, हे असे कसे चालेल. सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांनी पाणी आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूक राहून काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT