पुणे

पालखीमार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

अमृता चौगुले

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर-बारामती मार्गावर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू असून, गावोगावी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. मात्र, या रस्त्याच्या बाजूने वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद रस्ते ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अनेकदा अपघात देखील घडत असून, याबाबत उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवासी करीत आहेत.

सध्या अंथुर्णे व जंक्शन येथील उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी मोठे चौक असल्याने चारीबाजूंनी वाहतुकीची रहदारी असते. अशा परिस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी ठेवलेले रस्ते अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कायमच वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पर्यायी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आल्याने येणारी वाहने अत्यंत वेगाने येत आहेत. या दोन्ही ठिकाणी चौक असल्याने वाहने अचानक आडवी येत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. अशातच दोन्ही ठिकाणी सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. वाहतुकीस होत असलेला अडथळा व अरुंद रस्त्यांमुळे वाढलेल्या अपघाताच्या धोक्याचा विचार करून संबंधित यंत्रणेने तातडीने या पुलांची कामे मार्गी लावण्याची मागणी  होत आहे.

गेल्या दोन महिन्यांत 7 बळी

पालखी महामार्गावर वाहतुकीसाठी अरुंद रस्ते ठेवल्याने गेल्या 2 महिन्यांत जंक्शन ते गोतोंडी या 8 किलोमीटर अंतरामध्ये 5 अपघात झाले आहेत. यामध्ये 7 जणांचे बळी गेले आहेत. आनंदनगर येथील अर्चना श्रीशैल्य सन्मत व अनिता शिवाजी शिंदे, अंथुर्णे येथील हरिदास पांडुरंग क्षीरसागर, शेळगाव येथील सोमनाथ बबन पोंदकुले, शिरसटवाडी येथील मारुती शिरसट व माढा तालुक्यातील टाकळी येथील बाबूराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार यांचा यामध्ये समावेश आहे.

ठेकेदाराची वाहने सुसाट

गेल्या वर्षभरापासून पालखीमार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य ने-आण करण्यासाठी शंभरहून अधिक डंपर आहेत. यातील बहुतांश डंपर हे वाहतूक नियमांची पायमल्ली करीत आहेत. भरधाव डंपर पळविले जात आहेत. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा संबंधित यंत्रणेकडे तक्रारी करूनही त्यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते.

पालखीमार्गावरील दुभाजकामध्ये गाजरगवत

इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रस्त्याच्या मधोमध बनविण्यात आलेल्या दुभाजकामध्ये लावण्यात आलेल्या झाडांच्या आजूबाजूने सर्वत्र गाजरगवत उगवले आहे. परिणामी, झाडांची वाढ थांबली आहे. या संपूर्ण महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जवळपास सहा फूट अंतराचा दुभाजक ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये माती भरून फुलांची झाडेही लावण्यात आली आहेत. मात्र, या झाडांच्या संगोपनाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष नाही. या दुभाजकावर झाडांपेक्षा गाजरगवत जास्त दिसत आहे. प्रामुख्याने या झाडांना पाणीही वेळेवर मिळत नाही. साहजिकच, झाडांना मिळणारे अपुरे पाणी व गाजरगवताने दिलेल्या वेढ्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे.या झाडांची निगा राखली गेली नाही, तर झाडे जळून जाण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळेस प्रवास करताना या झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते. हीच झाडे समोरून येणारा प्रकाश रोखून धरून चालकाला साथ देणार आहेत. त्यामुळे या झाडांच्या बाजूची साफसफाई करून त्यांना तातडीने पाणी देण्याची मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT